जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू, उपस्थिती मात्र नगण्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST2021-02-16T04:36:37+5:302021-02-16T04:36:37+5:30
जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६५ असून, त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ९७२ एवढी आहे. पहिल्या दिवशी सर्वच ...

जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू, उपस्थिती मात्र नगण्यच
जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६५ असून, त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ९७२ एवढी आहे. पहिल्या दिवशी सर्वच महाविद्यालये सुरू झाली. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय तुरळक होती. विज्ञान शाखेचा ॲानलाइन अभ्यासक्रम झालेला आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे २८ फेब्रुवारीपर्यंत प्रात्याक्षिक पूर्ण करण्याच्या सूचना महाविद्यालयांना केलेल्या असल्याने, सर्वच महाविद्यालयांमध्ये पहिल्या दिवशी प्रात्याक्षिके झालीत. कला शाखेची महाविद्यालये सुरू झालेली असली तरी अनेक महाविद्यालयांमध्ये तासिका सुरू झालेल्या नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान राज्य शासनाने अद्याप वसतिगृह सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बाहेरगावचे विद्यार्थी पहिल्या दिवशी महाविद्यालयात आलेच नाहीत. केवळ स्थानिक विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली होती.
मास्क, सॅनिटायझरचा वापर
ज्या प्रमाणे शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशद्वाराजवळच तपासणी करण्यात आली होती, त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयांमध्येही प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशद्वाराजवळच थर्मल गनने तपासणी करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव वहीत लिहिण्यात आले. तसेच ज्यांच्या तासिका आहेत, त्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांनी कोरोनाविषयक काळजी घेतल्याचे चित्र हाेते. मात्र ग्रामीण भागात मास्क, सॅनिटायझरचा महाविद्यालयांबरोबरच विद्यार्थ्यांनाही विसर पडला होता.
विज्ञान शाखेची प्रात्यक्षिके झाली
शासनाच्या आदेशानुसार ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू झाली. महाविद्यालयात सॅनिटायझरची व्यवस्था केलेली होती. तसेच वर्ग खोल्यांमध्येही फवारणी करण्यात आली होती. विज्ञान शाखेचा ॲानलाइन अभ्यासक्रम झालेला असल्याने, आता सुरुवातीला फक्त प्रात्यक्षिके घेण्यात येत आहे. कला शाखेच्या तासिका सोमवारपासून सुरू होतील. महाविद्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
प्राचार्य पी.एच. पवार, जयहिंद महाविद्यालय धुळे.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
अनेक महिन्यानंतर महाविद्यालय सुरू झाले, याचा आनंद झाला आहे. आता नियमित तासिका व प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येणार आहे. ॲाफलाइन अभ्यासक्रम सुरू झाल्याने, विषय समजण्यास अधिक मदत होत असते.
-दुर्गेश्वरी जगदाळे. धुळे
महाविद्यालये बंद होती, तरी ॲानलाइन अभ्यासक्रम सुरू होता. आतापर्यंत बऱ्यापैकी सिलॅबस पूर्ण झालेले आहे. प्रात्याक्षिके अपूर्ण होती. मात्र आता महाविद्यालये सुरू झाल्याने, ती देखील पूर्ण होतील.
-यश मासुळे
महाविद्यालयात प्रवेश केल्यापासून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे. अनेक महिन्यानंतर महाविद्यालय सुरू झाल्याचा आनंद आहे. प्रात्याक्षिके पूर्ण झाल्यानंतर तासिकाही नियमित सुरू होतील.
मनोज पाटील
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये-६५
सुरू झालेली महाविद्यालये-६५
पहिल्या दिवशी उपस्थिती-४९९३
तालुकानिहाय उपस्थिती
धुळे तालुका-१५८२
साक्री तालुका-११३२
शिंदखेडा तालुका-९५८
शिरपूर तालुका- १३२१