सुगंधित तंबाखूचा सव्वातीन लाखांचा साठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:38 IST2021-05-20T04:38:55+5:302021-05-20T04:38:55+5:30
धुळे : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला सुगंधित तंबाखूचा सुमारे ३ लाख २६ हजार रुपये किमतीचा साठा स्थानिक गुन्हे ...

सुगंधित तंबाखूचा सव्वातीन लाखांचा साठा पकडला
धुळे : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला सुगंधित तंबाखूचा सुमारे ३ लाख २६ हजार रुपये किमतीचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडला आहे. हा साठा वाहून नेणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला असून, याबाबत अधिक चाैकशी सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय बातमीदारामार्फत या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. शिरपूरकडून धुळ्याकडे येणाऱ्या एच. आर. ५५ ए. बी. ३२०७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू असल्याचीही खबर होती. या वाहनावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी आणि पथकाला आदेश दिले.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या पथकाने सोनगीर, ता. धुळे टोलनाक्याजवळ ट्रक अडवून तपासणी केली. ट्रकमध्ये कपडे आणि भांड्यांच्या आडोशाला लपवून ठेवलेले बाॅक्स पोलिसांना दिसले. सुगंधित तंबाखूचे ५० बाॅक्स होते. प्रत्येक बाॅक्समध्ये ८० पुडे, असा एकूण ३ लाख २६ हजार रुपये किमतीचा तंबाखूचा साठा आणि १० लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण १३ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, हेडकाॅन्स्टेबल रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गाैतम सपकाळे, राहुल सानप, सागर शिर्के, विलास पाटील यांनी ही कारवाई केली.