अमरावती प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:52 IST2020-03-02T12:51:57+5:302020-03-02T12:52:25+5:30
मालपूर : विद्युत खोलीचा दरवाजा, खिडक्या तुटल्या, सुरक्षा रक्षक नसल्याने चिंता

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प सुरक्षा रक्षकांअभावी रामभरोसे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकल्पातील विद्युत खोलीचा दरवाजा, खिडक्या तुटल्या आहेत. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान होत आहे.
मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे आहेत. १० वक्राकार दरवाजाचा अमरावती नदी पात्रात मुख्य सांडवा आहे. स्वतंत्र विद्युत रोहित्र असून त्या खोलीचे दरवाजे, खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत. प्रकल्पाची देखभाल करण्यासाठी येथे सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. मात्र, येथे सुरक्षा रक्षक नसल्याने सुरक्षाच वाऱ्यावर आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
अमरावती धरणाच्या आतील व बाहेरील बांधावर मोठमोठे काटेरी वृक्ष वाढले असून यामुळे या बांधाला धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय या बांधावर मध्यभागी मोठमोठे तडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व काटेरी वृक्ष काढून पडलेले तडे दुरुस्त करणे गरजेचे आहे. तसेच या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांच्या मुख्य विमोचकांना मोठी गळती दिसून येत आहे. या विमोचकांच्या पक्क्या बांधकामाच्या भिंतीमधून पाणी निघतांना दिसून येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. हे पाणी वाचविणे गरजेचे आहे. मागीलवर्षी याच दिवसात मालपूर ग्रामस्थांनी कधी नव्हे एवढी पाणीटंचाई सोसली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व कळाले आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.
१४ वर्षांपासून या प्रकल्पात ठणठणाट असल्यामुळे डावा व उजव्या कालव्याच्या पोटचाºया अस्तित्वातच राहिलेल्या नाहीत. त्या पोटचाºया पाटबंधारे विभागामार्फत पुन्हा करण्यात याव्या, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.