दुसऱ्या लाटेतही जेष्ठ नागरिक ठरताहेत कोरोनाचे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:39+5:302021-03-25T04:34:39+5:30
धुळे : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली असून सर्वत्र कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जेष्ठ ...

दुसऱ्या लाटेतही जेष्ठ नागरिक ठरताहेत कोरोनाचे टार्गेट
धुळे : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली असून सर्वत्र कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जेष्ठ नागरिकच कोरोनाचे टार्गेट ठरत आहेत. पहिल्या लाटेची बाधा झालेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये जेष्ठांची संख्या अधिक होती. मात्र आता आढळणाऱ्या रुग्णांमध्ये जेष्ठांची संख्या जास्त असली तरी इतर वयोगटातील बाधित रुग्णांचे प्रमाण देखील वाढले आहे.
१८ फेब्रुवारी नंतर दुसऱ्या टप्प्यातील रुग्णवाढ सुरु झाली आहे. १८ फेब्रुवारीच्या आधी दैनंदिन रुग्णसंख्या सातत्याने ३० पेक्षा कमी होती. मात्र १९ फेब्रुवारी रोजी ३८ रुग्ण आढळले व दुसऱ्या दिवशीच रुग्णसंख्येने ५० चा टप्पाही ओलांडला. तसेच दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली. मंगळवारी तर आतापर्यंतचे सर्वाधिक ५५० रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीच्या पहिल्या टप्प्यात २६९ इतके एका दिवसात आढळलेले सर्वोच्च रुग्ण होते. आता मात्र दैनंदिन रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. १९ फेब्रुवारीनंतर एकूण ७ हजार ४०० रुग्ण आढळले आहेत. त्यात ५० पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच ३५ ते ५० या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण मागील लाटेच्या तुलनेत वाढले आहे. ५१ पेक्षा जास्त वयोगटातील सर्वाधिक २ हजार ७४७ रुग्ण आढळले आहेत. तर ३६ ते ५० या वयोगटातील २ हजार २८० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच १९ ते ३५ या वयोगटात १ हजार ४६३ रुग्ण आढळले आहेत.
मृतांमध्येही जेष्ठच जास्त -
रुग्णवाढीच्या दुसऱ्या टप्प्यात १८ फेब्रुवारी नंतर १४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जेष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. प्रामुख्याने ६० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मृतांमध्ये तरुण व महिलांचे प्रमाण कमी आहे. तसेच धुळे शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
कोरोना वाढतोय, काळजी घ्या..
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळायला हवे. तसेच बाहेर पडत असाल तर सोशल डिस्टंसिंगचे पालन करायला हवे. मात्र काही नागरिक अजूनही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळले आहे. कोरोनाची त्रिसूत्री पाळण्याची गरज आहे.
- डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी