त्या सोसायटीचे दोन गाळे सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 22:35 IST2020-05-28T22:35:33+5:302020-05-28T22:35:54+5:30
१० कोटींवर घोटाळा : फरार दोन संशयितांचा शोध सुरु

त्या सोसायटीचे दोन गाळे सील
धुळे : वेगवेगळे आमिष दाखवत ठेवीदारांची १० कोटी २९ लाखांवर फसवणूक करणाऱ्यांपैकी दोघांनी शिवतिर्थ चौकातील नहार कॉम्प्लेक्समध्ये दोन गाळे घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळताच धाड टाकण्यात आली़ ही दोन्ही गाळे सील करण्यात आले़
धुळे तालुक्यातील शिरुड येथे उज्ज्वलम अॅग्रो मल्टीस्टेट को आॅपरेटीव्ह सोसायटी प्रा़ लि़ नाशिक आणि माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड कार्यालय स्थापन करण्यात आले होते़ या ठिकाणी आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ या कालावधीत १ हजार ४६१ ठेवीदारांनी आपल्या वेगवेगळ्या रक्कमेची गुंतवणूक या सोसायटीत केली होती़ त्यांना आकर्षक व्याजदर, विविध प्रेक्षणीय स्थळी सहल यासह सोने-चांदी देण्याचे आमिष दाखविण्यात आले़ को आॅपरेटीव्ह सोसायटीचे स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडून प्रसार करण्यात आला़ ठेवीदारांकडून रोखीने ठेवी स्विकारण्यात आल्या़ पाठपुरावा करुनही त्याचा उपयोग होत नव्हता़ कार्यालय बंद करुन पसार झाल्याने संशय बळावला होता़ शिवतिर्थ चौकात नहार कॉम्प्लेक्समध्ये असलेले १३ आणि १४ नंबरचे दोन गाळेतून व्यवहार सुरु होता अशी गोपनीय माहिती याप्रकरणाचे तपासी अधिकारी तथा सपोनि हेमंत बेंडाळे यांना मिळाली़ माहिती मिळताच या गाळ्यांवर गुरुवारी दुपारी धाड टाकण्यात आली आणि हे दोन्ही गाळे सील केले़ भैय्यासाहेब यशवंत गुजेला (धुळे), भैय्या दिलीप अहिरे (धुळे) या दोघा संशयितांनी या गाळेमध्ये कार्यालय सुरु करुन ठेवीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ हे दोघे आता फरार असून त्यांच्या मागावर पोलीस आहेत़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, एलसीबी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत बेंडाळे व पथकातील भूषण जगताप, रविंद्र शिंपी, मनोज बाविस्कर, नितीन चव्हाण, सुरेश पाटील यांनी ही कारवाई केली आहे़