१४ तासांसाठी सर्व कब्रस्तानला ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:53 IST2020-04-09T21:52:54+5:302020-04-09T21:53:13+5:30
कोरोनाचा परिणाम : आयुक्तांचा आदेश

१४ तासांसाठी सर्व कब्रस्तानला ‘सील’
धुळे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे शहरातील सर्व कब्रस्तान ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपावेतो सील अर्थात बंद करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी पारीत केले आहेत़ दरम्यान, अत्यावश्यक सेवाही या काळात बंद राहणार आहेत़
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केलेला आहे़ परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होऊ शकते़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी भादंवि कलम १४४ (१) (३) अन्वये आदेश काढलेला आहे़ तसेच पोलीस अधीक्षक यांच्या पत्रान्वये पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़
या निमित्ताने ९ रोजी मुस्लीम बांधवांचा शब्ब ए बहारात हा सण साजरा होणार आहे़ त्यानिमित्त शहर व परिसरात मुस्लीम बांधव नमाज पठण करण्याकरीता विविध कब्रस्तानात जावून प्रार्थना करण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली फिरण्याची शक्यता आहे़ त्यामुळे १४ तासांकरीता सर्व कब्रस्तान हे बंद राहतील असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत़