रणरणत्या उन्हात होतेय तृष्णातृप्ती, ठिकठिकाणी पाणपोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:39 IST2021-03-25T21:39:30+5:302021-03-25T21:39:52+5:30
पारंपारिक माठाची जागा घेतली थंड पाण्याच्या जारने

dhule
धुळे : उन्हाची तीव्रता वाढली असून आता शरिराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासू लागली आहे. कामानिमित्त रणरणत्या उन्हात बाहेर पडलेल्या तहानलेल्या जीवांना पाणपोईचा गारवा मिळतो आहे.
उन्हाळा लागला की अनेक संस्था आणि मंडळे मोफत पाणपोईचा सेवाभावी उपक्रम सुरु करतात. दरवर्षाप्रमाणे यंदा देखील शहरात ठिकठिकाणी पाणपोयी सुरु झाल्या आहेत. शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या चाैकांमध्ये रोटरी क्लबसारख्या काही मोठ्या संस्थांनी कायमस्वरुपी पक्क्या पाणपोई बांधल्या आहेत. काही ठिकाणी पाणी आहे तर काही ठिकाणी मात्र पाणीच नसल्याने पाणपोई नावालाच आहेत. आता उन्हाळा लागल्याने या पाणपोई सुरु करण्याची आवश्यकता आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर नेहमीप्रमाणे पाणपोई अजुन सुुरु झालेल्या नाहीत. परंतु जसजसा उन्हाळा तीव्र होईल तसतशी पाणपोईंची संख्या वाढेल असा अनुभव आहे. परंतु यंदा कोरोनामुळे पाणपोईंची संख्या घटण्याची शक्यता आहे.
काही मंडळांनी मात्र नेहमीप्रमाणे पाणपोई सुरु केल्या आहेत. परंतु आता या पाणपोईंमध्ये पारंपारिक मातीच्या माठांची जागा थंड पाण्याच्या जारने घेतली आहे. पादचाऱ्यांसह, कामगार, कष्टकरी, फेरीवाले, प्रवासी, विद्यार्थी अशा साऱ्यांनाच तलान भागविण्यासाठी पाणपोईंचा आधार मिळाला आहे. ग्रामीण भागात बस थांब्यांजवळ पाणीपोई सुरु होत आहेत. बसची वाट पाहणाऱ्या किंवा खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी देखील या पाणपोई तहान भागविणाऱ्या ठरतात. सेवाभावी संस्थांनी गरज ओळखून पाणेपाई सुरु कराव्यात, अशी अपेक्षा आहे.
देवपूरातील नेहरु चाैकात हरीओम मित्र मंडळातर्फे मोफत पाणपोई बाराही महिने सुरु आहे. थंड पाण्याचे १०० जार दररोज लागतात. याठिकाणी दवाखाने आहेत, बसेस थांबतात, इतर प्रवासी वाहनेही थांबतात, बाजारकरुंची आणि एकविरा देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. या साऱ्यांची तहाण पाणपोईमुळे भागते.
धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वकील संघाने पाणपोई सुरु केली आहे. जिल्हा न्यायालयात जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी असते. दुपारच्या वेळी तहाण भागविण्यासाठी पाण्याची शोधाशोध होते. परंतु या पाणपोईमुळे कोर्टात येणाऱ्यांची तहाण भागते आहे.
कोरोना नियमांचे पालन व्हावे
पाणपोईच्या ठिकाणी पूर्णवेळ कुणाचेही नियंत्रण नसते. तहानलेल्या व्यक्तीला स्वत: पाणी घेवून प्यावे लागते. रस्त्याने जाणारा कुणीही व्यक्ती पाणी पितो. येथील ग्लासला आणि जारला अनेकांचा स्पर्श होतो. त्यामुळे पाणपोईच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. सॅनिटायझरची व्यवस्था केली पाहिजे. पाणी पिण्यासाठी येणाऱ्यांनी देखील हात सॅनिटाईझ केल्याशिवाय जारला किंवा ग्लासला स्पर्श करुन नये, अशी जनजागृती आवश्यक आहे. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी.