धुळे : कोराेनाची लाट ओसरली तरी शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाही.गेल्यावर्षाप्रमाणे यावर्षीही अजुनतरी ॲानलाइन शिक्षणच सुरू आहे. परिणामी विद्यार्थी घरीच आहेत. त्यामुळे मुलांना घरी सांभाळतांना पालकांच्याही नाकीनऊ आले आहे. मुलांना मोबाईलची सवय लागली असून, त्यांना या सवयीपासून कसे दूर करावे अशी चिंता आता पालकांना सतावू लागला आहे.
गेल्यावर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॅाकडाऊन केल्याने, मार्च २०२०पासून शाळा बंद आहे. त्यानंतर अनलॅाक झाले तरी शाळा बंदच आहे. यावर्षी जुलैपासून ग्रामीण भागात ॲानलाइन शिक्षणास सुरूवात झालेली आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू झालेल्या नाहीत. ॲानलाइन शिक्षणासाठी पालकांनी मुलांना स्मार्टफोन दिलेला आहे. मात्र विद्यार्थ्यांना या स्मार्टफोनची सवय लागली आहे. एवढेच नाही तर विद्यार्थी घरीच असल्याने,त्यांच्यातही चिडचिडपणा निर्माण झालेला आहे. त्यांना खुल्या वातावरणात वावरता येत नाही. तसेच पालकांचाही चिडचिडेपणा वाढला आहे.
मुलांच्या समस्या
गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुले घरी कंटाळलेली आहे
घरी असतांना पालकांचा अभ्यासाचा सारखा तगादा मागे लागलेला असतो.
काही ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने, विद्यार्थ्यांना नीट अभ्यास करता येत नाही.
पालकांच्या समस्या
अॲानलाइन अभ्यास संपल्यानंतरही मोबाईल मुलांच्या ताब्यात असतो.
काही ठिकाणी घरात एकाचकडे स्मार्टफोन असतो. त्यामुळे अन्य ठिकाणी संपर्कास अडचण येते
ॲानलाइन शिक्षणामुळे मोबाईल डाटाही तेव्हाच संपतो.
शाळा सुरू करणे गरजेचे
कोरोनाची लाट ओसलेली आहे. ग्रामीण भाग तर कोरोनामुक्तही झालेला आहे. त्यामुळे आता शाळा ॲाफलाइन सुरू केल्या पाहिजेत. शाळा प्रत्यक्ष सुरू केल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचाही मनमुराद आनंद घेता येऊ शकेल.
लहान मुलांना मुक्तसंचार आवडत असतो. मात्र कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा बंद असल्याने, मुले मोबाईलद्वारेच अभ्यास करीत आहेत. सातत्याने मोबाईलचा वापर केल्याने, त्यांच्या डोळ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शाळा बंद असल्याने खेळही बंद आहे. त्यातून स्थुलता येते.
- डॉ. के.के.जोशी,
मानसोपचार तज्ज्ञ.