शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देणार प्रगत शाळांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 15:36 IST2017-10-15T15:35:21+5:302017-10-15T15:36:47+5:30
जिल्ह्यातील ६९९0 सदस्यांचे २ व ३ नोव्हेंबर रोजी भेटी देण्याचे नियोजन

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देणार प्रगत शाळांना भेटी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे आता केंद्रांतर्गत असलेल्या डिजीटल, प्रगत शाळांना भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रेरणा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील ६९९० शाळा व्यवस्थापन समिती सदस्य २ व ३ नोव्हेंबर रोजी प्रगत शाळांना भेटी देतील.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट) व प्राथमिक शिक्षण विभाग जि.प.धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना १०० टक्के मुले शिकत असणाºया प्रगत शाळा, शाळा सिद्धीअंतर्गत ‘ए’ग्रेड शाळा, डिजीटल शाळा, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे आदर्श पटाच्या शाळा, जास्त पटाच्या समृद्ध शाळा, तसेच ज्या शाळेसाठी समाजाने मोठ्या स्वरूपात निधी, भौतिक व शैक्षणिक सुविधा दिल्या आहेत, अशा शाळांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याठिकाणी कार्याची प्रत्यक्ष पहाणी करून, समजून घेणे, संबंधित शाळेने केलेले उल्लेखनीय कार्य समजून घेत, आपल्या शाळाही तशाच करण्याचा प्रयत्न करणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश आहे. एक प्रकारे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना ‘प्रेरणा’ देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११६५ शाळा आहेत. यातील प्रत्येक शाळेतील सहा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळांना भेटी देतील. असे एकूण जवळपास ६९९० सदस्य २ व ३ नोव्हेंबर १७ दरम्यान केंद्रांतर्गत शाळांना भेटी देतील असे डायट कार्यालयातून सांगण्यात आले.
मुख्याध्यापक, शिक्षक मार्गदर्शन करणार
या उपक्रमांतर्गत केंद्रातील एका आदर्श शाळेची निवड करण्यात येऊन, तेथे त्या केंद्रातील शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य भेट देतील. त्या शाळेत तेथील मुख्याध्यापक व शिक्षक डिजीटल शाळा, भौतिक सुविधेसाठी लोकसहभाग, स्वच्छ विद्यालय-स्वच्छ महाराष्टÑ, विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी व सर्वंकष विकास, आदींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शाळांना भेटी दिल्यानंतर केंद्रातील उर्वरित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही आपल्या शाळा डिजीटल करण्यासाठी प्रयत्न करावे, हाच त्यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.