अनलॉकमध्ये शाळा लॉकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:35 IST2020-06-30T22:34:24+5:302020-06-30T22:35:22+5:30
धुळे : शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला अद्याप पत्र नाही

dhule
धुळे :१ जुलैपासून शाळा सुरू करण्याचे शासनाचे आदेश असले तरी मंगळवार सायंकाळपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा अजुनही बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २३ मार्च पासूनच पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे निकालही लागलेले नाहीत. विद्यार्थ्यांना सरळ पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आलेला आहे. दरवर्षी १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असते. मात्र यावर्षी ते सुरू झालेले नाही. दरम्यान ज्या भागात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असेल तिथे १ जुलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे अशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना होत्या. त्यासाठी शासनाने शाळा सुरू करण्याचे टप्पेही जाहीर केले होते. पहिल्या टप्यात म्हणजे १ जुलैपासून माध्यमिकचे नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन होते. दरम्यान धुळे जिल्ह्यात अनलॉकच्या काळातच कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दररोज १०० पेक्षा अधिक रूग्ण बाधित निघत असल्याने, चिंता वाढली. कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केलेला आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे तसे अवघडच झालेले आहे. मात्र शासनाचे आदेश असल्याने माध्यमिक विभागाने पूर्व तयारी करून ठेवली होती. मंगळवार सायंकाळपर्यंत शाळा सुरू करण्याचे कुठलेही आदेश नसल्याने शाळा बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.