गर्दी कमी तरीही उत्पन्न सुरू झाल्याचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 22:13 IST2020-08-07T22:12:43+5:302020-08-07T22:13:11+5:30
सलून व्यावसायिक : शासनाच्या नियमांचे पालन करुन ग्राहकांना दिली जातेय शिरपूरमध्ये सेवा

गर्दी कमी तरीही उत्पन्न सुरू झाल्याचे समाधान
शिरपूर : लॉकडाऊनच्या कालावधीत व्यवसाय बंद ठेवल्याने आर्थिक संकट ओढावलेल्या सलून व्यावसायिकांना रविवारपासून काहीसा दिलासा मिळाला़ सलून व्यवसाय सुरू झाला असला तरी सुट्टीचा दिवस रविवार असूनही ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे़ ग्राहकांची गर्दी कमी असली तरी उत्पन्न सुरू झाल्याचे समाधान सलून व्यावसायिकांमध्ये आहे़
लॉकडाऊनच्या तीन टप्प्यांपर्यंत सर्वच व्यवसाय, उद्योग बंदच राहिले़ त्यामुळे या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते़ चौथ्या टप्प्यानंतर काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली होती़ त्यामुळे सलून, ब्युटी पार्लर यांनाही सुरू करण्याची परवानगी देण्यात आली़ मात्र, १२ दिवसानंतर पुन्हा या व्यवसायांवर बंदी घालण्यात आली़ त्यामुळे साहजिकच व्यवसायावर परिणाम झाला़ शासनाने सलून, ब्युटीपार्लर यांना काही अटी व शर्तीवर २८ जूनपासून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली़ त्यानुसार सलून व ब्युटीपार्लर यामध्ये केस कापणे, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडींग आदी निवडक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे़ त्यामुळे सलून व्यावसायिकांनी २७ जून रोजी आपआपली दुकानांची साफसफाई करून सज्ज केलीत़ मात्र शहरात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे २८ जून ते ४ जुलैपर्यंत दुकाने उघडता आली नाहीत़ त्यामुळे या दुकानदारांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागली़ ५ जुलैपासून सलून दुकाने उघडलीत़ रविवार असूनही अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी दिसत होती़ त्यातच केवळ केस कापण्याची परवानगी देण्यात आल्याने अनेकांनी पाठ फिरविली़ मात्र असे असले तरी लॉकडाऊननंतर इतर व्यवसायांबरोबरच सलून व्यवसायाला परवानगी दिल्याने आर्थिक उत्पन्न सुरू झाल्याचे येथील नाभिक समाज दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र येशी यांनी सांगितले़
शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करूनच सलूनमधून सेवा दिली जात आहे़ त्वचेशी संबंधित कोणतीही सेवा दिली जात नसल्याचे येशी यांनी सांगितले़ आजवर बंद असलेला सलून व्यवसाय सुरू झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे़
खूप दिवसांनी सलून व्यवसाय सुरू झाल्याचे समाधान आहे़ दुकानातील सर्व वस्तु सॅनिटायझरने साफ करून ठेवण्यात आली आहेत़ फेस शिल्ड, हॅण्डग्लोजचा वापर केला जात आहे़
- रामचंद्र येशी, व्यावसायिक