वाळू माफियांचा हैदोस सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:19 IST2019-11-23T11:19:07+5:302019-11-23T11:19:42+5:30
भल्या पहाटे होतो उपसा : धोबी धवन बंधारा सोडून आता अमरावती नदी पात्रात वळविला मोर्चा

Dhule
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील दोंडाईचा साक्री रस्त्यालगत धोबी धवन बंधारा सोडून रात्री, भल्या पहाटे पासून अमरावती नदी पात्रातून वाळुचा अवैध उपसा होत असुन यांना कोणाचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते. येथे अक्षरश: या माफियांनी हैदोस घातला असुन महसूल विभागाचा आशीर्वाद असून याला अर्थकारण जबाबदार असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत तक्रार करुन देखील पाठिशी घातले जात आहे.
येथे वाळु माफियांनी प्रचंड हैदोस घातला असून भल्या पहाटे रात्रीतून उपशाला सुरुवात होत असते. ही वाळुची दोंडाईचा शहरांच्या दिसेने वाहतूक होते. यामुळे दोंडाईचा-मालपूर रस्त्याची देखील दुरवस्था होण्यास वेळ लागणार नाही. मात्र याकडे महसूल विभाग पध्दतशीर डोळे झाक करत आहे . या वाळुची दोंडाईचाहून लांब दिशेने प्रवास होत असल्याचे दबक्या आवाजात सांगितले जाते. यामुळे ट्रॅक्टरधारक देखील लाखोंचा शासनाचा महसूल बुडवित असेल तर याला जबाबदार कोण? यासंदर्भात ‘लोकमत’मधुन वृत्त प्रसारित झाल्यानंतर या वाळु तस्करांनी धोबी धवन बंधारा सोडून अमरावती नदी पात्र निवडले आहे. याकडे कोणी बोट दाखवला त्याचा शोध घ्यावा, असे तेथील शेतकरी भटु रावल यांनी मागणी केली आहे.
यापूर्वी देखील अमरावती मध्यम प्रकल्पातून राजरोसपणे अवैध वाळुचा उपसा होत होता. मात्र हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे या वाळु माफियांनी त्यांचा मोर्चा आता अमरावती नदी पात्र, धोबी धवन बंधारा परिसर तसेच शेतशिवारातील लहान मोठे लवण याकडे वळवला आहे. याआधी सुराय ग्रामस्थांनी त्यांच्या शिवारामधुन काही ट्रॅक्टर पकडून महसूल अधिकाऱ्यांकडे सोपविले होते. मात्र थातुरमाथुर कार्यवाही करुन सोडून दिल्याचे समजते. यामुळे गावकरी आता रिस्क घेण्याचे टाळतात. यामुळे वाळु माफिया फोफावतांना दिसून येत आहेत.
यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने अमरावती प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. दोन वेळेस पुन्हा भरला असता एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळुचा साठा असून अतिशय चांगल्या प्रकारची वाळु असल्यामुळे तिला मोठी मागणी आहे. यामुळे वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे. येथे वाळुचा कुठल्याही प्रकारचा ठेका दिला नसून अवैध उपसा होत आहे. तरी याकडे महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन ही वाळु चोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच केलेल्या तक्रारीची दखल घ्यावी.