सामोडे येथे मध्यरात्री शिक्षण संस्थाचालकाकडे सशस्त्र दरोडा, फायर करून कुटुंबाला धमकविले, ४० ते ४५ तोळे सोन्यासह लाखोंची रोकड लुटून नेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:11+5:302021-01-14T04:30:11+5:30
सामोडे गावात जयदया शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचे चालक शरद दयाराम शिंदे व अनिल दयाराम शिंदे हे दोघे ...

सामोडे येथे मध्यरात्री शिक्षण संस्थाचालकाकडे सशस्त्र दरोडा, फायर करून कुटुंबाला धमकविले, ४० ते ४५ तोळे सोन्यासह लाखोंची रोकड लुटून नेली
सामोडे गावात जयदया शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचे चालक शरद दयाराम शिंदे व अनिल दयाराम शिंदे हे दोघे भाऊ शेतात घर बांधून शेजारी- शेजारीच राहतात. मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास पाच सशस्त्र दरोडेखोरांनी शरद दयाराम शिंदे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी घरात शिंदे कुटुंबातील तीन सदस्य होते.
दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी घरात घुसताच शरद शिंदे यांना झोपेतून उठविले. घरात असलेल्या त्यांच्या पत्नी ऊर्मिला व मुलगा ज्ञानेश यांनाही झोपेतून उठविले. मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल हिसकाविले व पलंगावर एक फायर केला. कुठलाही आरडाओरडा न करता घरात असलेले सोने व पैसे आम्हाला द्या; अन्यथा मारून टाकू, अशी धमकी देत तिघा शिंदे कुटुंबियांना एका घरात कोंडले. त्यानंतर घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे ४० ते ४५ तोळे सोने व दोन लाख रुपये रोख, असा ऐवज घेऊन दरोडेखोर तासाभरानंतर तेथून पसार झाले. त्याआधी त्यांनी घराबाहेर असलेली गाडी पंक्चर केली. घर बाहेरून लावून मोबाइल घराबाहेर फेकून दिले. दरोडेखोर फरार झाल्यानंतर घरातूनच शरद शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी आरडाओरड करीत शेजारी राहणाऱ्या अनिल शिंदे यांना बोलविले. त्यानंतर अनिल शिंदे यांनी घराचा बाहेरून लावलेला दरवाजा उघडला आणि तातडीने पिंपळनेर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी श्वान पथक बोलविण्यात आले होते. श्वान घरापासून ५० मीटर अंतरापर्यंतच गेला. तेथून दरोडेखोर हे वाहनाच्या मदतीने पसार झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनीही घटनास्थळी दाखल भेट दिली. यासंदर्भात संस्थाचालक शरद शिंदे यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. दरोडेखोर हिंदी भाषेत बोलत होते. त्यांनी तोंडाला मोठे रुमाल बांधले होते.