स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजी राजांनी जीवन समर्पित केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:40+5:302021-01-22T04:32:40+5:30
शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड. बी. पाटील महाविद्यालयात मायक्रोसॉफ्ट टीम या व्यासपीठावर आयोजित ऑनलाईन राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत ...

स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजी राजांनी जीवन समर्पित केले
शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड. बी. पाटील महाविद्यालयात मायक्रोसॉफ्ट टीम या व्यासपीठावर आयोजित ऑनलाईन राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत ‘शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक धगधगता अंगार’ या विषयावर डॉ. पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जयहिंद शैक्षणिक संस्थेचे सचिव प्रदीप भदाणे होते. तर संस्थेचे व्हा. चेअरमन प्रमोद पाटील, महाविद्यालय विकास समिती चेअरमन प्रा. सुधीर पाटील व संचालिका डॉ. नीलिमा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, ‘स्वराज्यरक्षक संभाजी राजे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे हे असामान्यत्व त्यांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनपटात पाहायला मिळते. त्यांनी बालपणापासून मृत्यूपर्यंत सतत केलेला संघर्ष, त्यांनी अनंत यातना आणि मानहानी सहन करत महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी अथक प्रयत्न केले. संभाजीराजांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे राबविल्या. स्वराज्य प्रेरक, कर्तव्यदक्ष प्रशासक, थोर मुत्सद्दी राजकारणी धुरंदर राजमाता जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला. अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान यातून समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व गाजविले आणि म्हणूनच संभाजी महाराज एकमेवाद्वितीय होते.
प्रदीप भदाणे म्हणाले की, स्वराज्यरक्षक, धर्मवीर, संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आयुष्यात आलेल्या संकटांना न डगमगता त्यांनी समर्थपणे झेपही घेतली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असामान्य शौर्याचा परिचय देत अजोड पराक्रम गाजवला.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एच पवार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. भाग्यश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमाला संयोजिका प्रा. डॉ. योगिता पाटील, समिती सदस्य प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे, प्रा. विजय जवराळ, प्रा. गिरीश देसले, प्रा. निखिल पाटील, प्रा. मोरेश्वर नेरकर, प्रा. कल्पना देवरे, प्रा. समीर शहा, प्रा. हर्षल गवळे प्रा. नीलिमा भदाणे, विलास सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.