क्षुल्लक कारणावरुन साक्रीत वृध्दाला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:17 IST2021-03-25T21:16:56+5:302021-03-25T21:17:05+5:30
६ जणांविरुध्द गुन्हा, काही काळ होते तणावाचे वातावरण

क्षुल्लक कारणावरुन साक्रीत वृध्दाला झोडपले
धुळे : क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ करीत घरात घुसून एका वृध्दाला हाताबुक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या वृध्दाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने सहा जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
ट्रॅक्टर घेवून आलेल्या एकाने पाटचारीला लावलेले दगड काढून फेकले. हे दगड का फेकले असे विचारल्याच्या कारणावरुन आलेल्या जमावाकडून हिम्मत संपत पाटील (६६, रा. दिघावे ता. साक्री) यांच्याशी वाद घालण्यात आला. शाब्दीक चकमकीनंतर शिवीगाळ करीत वेळ हाणामारीपर्यंत येवून पोहचली. हाताबुक्याने मारहाण करत असताना त्यांची पत्नी वाचविण्यासाठी आली असता तिला ढकलून देण्यात आले. त्याचवेळेस मोबाईल घेण्यासाठी घरात पाटील हे येताच त्यांच्या पाठोपाठ जमावाने घरात घुसून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करीत दमदाटीही केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी झालेल्या हिम्मत पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर हिम्मत संपत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयित बंडू एकनाथ मराठे याच्यासह ६ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.