शहराचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे व अरविंद भोसले यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. सुभाष चौकात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास आमदार मंजुळा गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, महेश मिस्तरी, तालुका प्रमुख पंकज मराठे, विशाल देसले, अमित नागरे, सुमित नागरे, व ग्रामीण भागातून आलेले असंख्य शिवसैनिक या वेळेस उपस्थित होते.
आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर नागरे हे शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ होती ती शेवटी खरी ठरली. त्यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे येणारी निवडणूक ही ते शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली लढवतील हे निश्चित झाले आहे.पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की चिन्ह कोणतेही असो काम करणारा कार्यकर्ता असला तर सत्ता आपोआप मिळते. नागरे हे शिवसेनेत आल्याने सेनेची ताकद वाढली असून साक्री नगरपंचायतवर निश्चितच भगवा फडकेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
साक्री नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी सहा कोटी रुपये मंजूर केले असून दिमाखदार इमारत आता उभी राहील. परंतु या इमारतीवर दुसऱ्या पक्षाचा झेंडा फडकणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असा अशी सूचनाही केली. त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की साक्री शहरासाठी चाळीस कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाले आले आहे. आता ‘पानी पिला पिला के मारेंगे’ असा मिश्कील टोलाही लगावला.
ज्ञानेश्वर नागरे म्हणाले, सत्तेशिवाय शहाणपण नाही. शहराचा विकास करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी मात्र आक्रमकपणे शिवसेनेचा अजेंडा राबवण्याची सूचना केली. जुन्या सैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही व त्यांचा सन्मान राखला जाईल, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.
साक्री शहरात शिवसेनेच्या फलकांचे अनावरण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन नितीन बेडसे यांनी केले.