The rush to shop as soon as the weekend lockdown wakes up | वीकेंड लॉकडाऊन उठताच खरेदीसाठी उडाली झुंबड

वीकेंड लॉकडाऊन उठताच खरेदीसाठी उडाली झुंबड

धुळे : कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन करण्यात आले. दोन दिवसांच्या या बंदमध्ये व्यापारी प्रतिष्ठानांसह सर्वच व्यवहार ठप्प करण्यात आले. वीकेंड लॉकडाऊन उठताच सोमवारी सकाळी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली होती. त्यात पुन्हा मंगळवारी गुढीपाडवा असल्यामुळे या गर्दीत अधिकच भर पडल्याचे चित्र शहरात सर्वदूर दिसून आले. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनासह पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसून आले.

आग्रारोड गजबजला

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन प्रशासनाने घोषित केल्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरात पूर्णपणे लॉकडाऊन होता. सर्वच प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने बंदच होती. परिणामी रस्ते निर्मनुष्य दिसून आले. त्यानंतर शांत असलेला आग्रा रोडवर सोमवारी सकाळपासून गर्दी असल्याचे दिसून आले. महात्मा गांधी पुतळा ते दसेरा मैदानपावेतो संपूर्ण रस्ता गजबजला होता.

इलेक्ट्रिक दुकानांमध्ये गर्दी

कोरोनाचा प्रादुर्भाव असलातरी नागरिकांकडून खरेदी करण्याचे काम थांबले असे म्हणता येणार नाही. मंगळवारी गुढीपाडवा असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला बाजारातील इलेक्ट्रिक दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वेगवेगळ्या वस्तू खरेदी झाल्यामुळे लाखोंची उलाढाल झाली. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीनसह अन्य वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.

किराणा दुकानांमध्ये रेलचेल

दोन दिवसांनंतर लॉकडाऊन लागल्यास आपले हाल होऊ नये आणि गुढीपाडवा सण असल्यामुळे शहरातील लहान-मोठ्या किराणा दुकानांमध्ये नेहमीपेक्षा जास्तच गर्दी दिसून आली. यात दैनंदिन गरजेच्या किराणाच्या वस्तूंची खरेदी झाली.

लाखोंची उलाढाल

कोरोना असलातरी त्याचे कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक न मानता बिनधास्तपणे नागरिकांनी गावात गर्दी केली होती. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह चैनीच्या वस्तूची खरेदी नागरिकांनी केल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल बाजारपेठेत झाली. सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यांवर आणि दुकानांवर गर्दी कायम होती.

वाहतुकीची कोंडी

दोन दिवस शांत असलेला आग्रारोड सोमवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने गजबजलेला दिसून आला. त्यात पायी जाणाऱ्या नागरिकांसह दुचाकी व रिक्षांनीदेखील आपली एन्ट्री घेतल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडलेली दिसून आली. परिणामी पायी चालणेही मुश्कील झाले होते.

रिक्षांची चाके धावू लागली

प्रवाशी नसल्याने आणि दोन दिवस सर्वच बंद असल्यामुळे शहरात कुठेही रिक्षा दिसत नव्हत्या. केवळ रुग्णालयाजवळ काही मोजक्याच रिक्षा होत्या. व्यवहार सुरळीत झाल्यामुळे आणि नागरिकदेखील खरेदी करण्यासाठी बाहेर येत असल्यामुळे रिक्षांची चाके धावू लागल्याचे दिसून आले.

पोलीस ठरले हतबल

शहरातील आग्रारोडसह बाजारपेठेत उसळलेली गर्दी इतकी मोठ्या प्रमाणावर होती की, ती हटविण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसून आलेला नाही. महापालिका प्रशासनासह पोलिसांचीदेखील हतबलता यातून प्रकर्षाने जाणवली.

Web Title: The rush to shop as soon as the weekend lockdown wakes up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.