लोकसहभागातून ग्रामविकास करणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:28+5:302021-05-12T04:37:28+5:30
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयो नदी ...

लोकसहभागातून ग्रामविकास करणे शक्य
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयो नदी को जानीए समन्वयो का समन्वय’ या ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बोलत होते.
जलबिरादरीचे नरेंद्र छुग, विनोद बोधनकर, जळगाव विद्यापीठाचे समन्वयक डॉ. पंकज नन्नवरे, सहसमन्वयक डॉ. सचिन नांद्रे, सुबोध पाटील, विशाल सोनकुळे आदी उपस्थित होते.
चैत्राम पवार पुढे म्हणाले की, ग्रामविकासाचा हा यज्ञ देशातील प्रत्येक गावात तरुणांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविता येऊ शकतो. जल, जंगल, जमीन, जन, जनावर या पंचसूत्रीच्या व्यवस्थापनाने काम केले, तर यश निश्चित मिळेल.
शिरपूरचे भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर म्हणाले की, भूपृष्ठावर पाणी थांबवायचे असेल, तर लहान -मोठे बंधारे बांधून पाणी जिरविणे महत्त्वाचे आहे. असा प्रयोग शिरपूर तालुक्यातील ७० गावांच्या पाण्याची पातळी 300 फुटांवरून ७० फुटांवर आणून यशस्वी केल्यामुळेच, शिरपूर पॅटर्नला सर्वदूर ओळख आहे.
साक्रीचे कॉम्रेड सुभाष कांकुस्ते यांनी वनहक्क कायदा व आदिवासींच्या समस्यांविषयी माहिती दिली. धुळे कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दिनेश नांद्रे यांनी शासनाच्या कृषी संदर्भातील विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सुयोग्य रीतीने पोहोचविल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदवन फुलविता येईल, असे सांगितले. डॉ. धनंजय नेवाडकर यांनी लामकानी गावाच्या माळरानावर पाणलोट विकासाचे कार्य अनुभवातून मांडले. दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी जलसाक्षरतेचा झेंडा हातात घेऊन तलाठी व परिसरातील गावातील ग्रामस्थांना पाणी फाउंडेशन विषयी भारूड, भजन, गाणे म्हणून जागृती केली. यावेळी बचत गटाच्या प्रवर्तक मीना भोसले यांनी स्त्रियांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे देत त्यातील लक्ष्मीरूपाचा परिचय करून, स्त्री स्वावलंबनाचा मार्ग दाखविला.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम कोळेकर, प्राचार्य बी.एम.भामरे, प्रा. डॉ. लहू पवार (साक्री), आरीफ शेख (निजामपूर) यांनी विविध विषयांवर माहिती दिली. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी महाराष्ट्र जल बिरादरी आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून नवीन दिशा देऊन सशक्त भारत सुजलाम सुफलाम होईल, असे ते म्हणाले.
या ऑनलाइन संवाद यात्रेत नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर, महाराष्ट्र जल बिरादरीचे विनोद बोधनकर, नरेंद्र छुग, सुबोध पाटील, विशाल सोनकुळे, दहिवेलचे प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे, विमलबाई पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस सोनवणे, माजी प्राचार्य बी. एस. पाटील यांच्यासह ७० जणांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी रासेयोचे स्वयंसेवक अनिल बागूल, जयेश नांद्रे, भावेश बच्छाव यांनी परिश्रम घेतले.