धुळ्यात पंजाब नॅशनल बॅँकेतून १० लाख रुपयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:05 IST2018-01-10T16:04:37+5:302018-01-10T16:05:58+5:30
धुळे शहरातील भरदुपारची घटना, महिनाभरातील लुटीची दुसरी मोठी घटना, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

धुळ्यात पंजाब नॅशनल बॅँकेतून १० लाख रुपयांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पंजाब नॅशनल बॅँकेच्या शहरातील मुख्य शाखेतून कॅशिअरजवळ वाटपासाठी काढून ठेवलेले १० लाख रूपयांची चोरी झाल्याची घटना बुधवारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. महिनाभरात दुसºयांदा घडलेल्या लुटीच्या अशा घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटना घडल्याचे कळताच नाकाबंदी करण्यात आली. परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या बॅँकेतील चोरीची ही चौथी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळी बॅँकेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी कॅशिअरकडे आर्थिक व्यवहारांसाठी सुमारे १० लाख रुपयांची रक्कम ठेवलेली होती. ग्राहकांची गर्दी झालेली होती. याच गर्दीचा फायदा उचलत कॅशिअर मधुकर वाघ यांच्या कक्षाच्या आत जाऊन तेथे व्यवहारासाठी ठेवलेली १० लाखांची रक्कम उचलून चोरट्याने बॅँकेतून पोबारा केला. कॅशिअर वाघ व शिपाई आनंद सैंदाणे हे दोघे तेव्हा तेथेच होते. मात्र जेव्हा ग्राहकास रक्कम देण्याची वेळ आली तेव्हा पैसे चोरी झाल्याचे कॅशिअर वाघ यांच्या लक्षात आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. याबाबत लगेच आझादनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव तत्काळ सहकाºयांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासासाठी आवश्यक पाहणी केली. तसेच त्यासाठी बॅँकेचे व्यवस्थापक उदयकुमार सिन्हा, कॅशिअर मधुकर वाघ, शिपाई आनंद सैंदाणे सुरक्षारक्षक दिलीप सोनवणे यांना विचारपूस करून माहिती घेतली.
बॅँकेत १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली. त्यातील छायाचित्रे स्पष्ट नाहीत. परंतु पोलिसांनी ती ताब्यात घेतली. अचानक घडलेल्या या घटनेच्या धक्क्याने बॅँकेचे व्यवस्थापक उदयकुमार सिन्हा व त्यांचा सर्व स्टाफ गोंधळून गेला होता. काही वेळ बॅँकेतील व्यवहार थांबले होते. परंतु नंतर थोड्या वेळानंतर ते पूर्ववत सुरू झाले.