रोबोट करणार भूमिगत गटारींची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:16 IST2020-06-07T13:16:00+5:302020-06-07T13:16:42+5:30
महापालिका । कमी मनुष्यबळात होणार स्वच्छता; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने निर्णय

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील भुमीगत व मोठया गटारींचे मेनहोल स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने दोन क्लिनिंग रोबोट मशिन खरेदी केले आहे़ या मशिनद्वारे शहरातील भूमिगत गटारीची स्वच्छता केली जाणार आहे़ या मशिनचा लोकार्पण खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते शनिवारी झाला़
शहरात सद्यस्थितीत असलेल्या भुमिगत व मोठया गटारींचे चेंबर तसेच मेनहोल चोकप झाल्यानंतर स्वच्छतेसाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात येत होता. मॅनहोलमध्ये जमा झालेल्या ठिकाणी तीव्र उष्णता आॅक्सीजनची कमतरता व विषारी वायुमुळे राज्यात अनेक सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे मॅन्युअल स्कॅव्हींगला भारतात बंदी घातलेली आहे़ ही स्वच्छतेची पध्दत बंद होण्यासाठी व तांत्रिक मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे़ यासाठी रोबोट तयार करण्यात आले आहे़ कचऱ्यांचे प्रभावी व कार्यक्षम व्यवस्थापन करुन शहरातील स्वच्छतेची परिस्थिती सुधारण्यासाठी या शास्त्रोक्त पध्दतीचा उपयोग होणार आहे़ या कामी भारत पेट्रोलियम कंपनीने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार आयुक्त अजिज शेख यांनी मानले़
यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे, स्नेहल जाधव, नगरसेवक राजेश पवार, देवेंद्र सोनार, रावसाहेब नोंद्रे, दगडू बागुल, प्रवीण अग्रवाल, उपायुक्त गणेश गिरी, सहा. आयुक्त शांताराम गोसावी, अभियंता कैलास शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, सहाय्यक आरोग्य चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. आभार सहाय्यक आयुक्त विनायक कोते यांनी मानले़