मालपूर/थाळनेर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील गरजू शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात कापूस विक्रीला काढला आहे. परतीचा पाऊस सतत धुमाकुळ घालत असल्यामुळे ओला झालेला कापूस नाईलाजास्तव कमी दरात विकावा लागतो आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात पावसाने मातीमोल झालेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने घरातच पडून आहे. सध्या सर्वदूर हीच स्थिती दिसून येत आहे.मालपूरसह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात या कापसाची प्रत खराब झाल्यामुळे तसच कापसाला काहीअंशी ओलावा आढळून येत असल्याने हक्काची येथे बाजारपेठ किंवा खरेदी केंद्र नाही. त्यामुळे खासगी व्यापारी मनमानी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना दिसून येत आहे. तर शेतकरी देखील नाईलाजास्तव आगामी हंगामाच्या भांडवलासाठी कमी दराने विक्री करत आहे.आगामी रब्बी हंगामपूर्व शेतीच्या मशागतीसाठी बी-बियाणे कापूस वेचणी मजुरीसाठी हातात पैसे शिल्लक नसल्यामुळे हमी भावापेक्षा कमी भावात सध्या येथे खरेदी विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.यंदा येथे पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड झाली.सर्वात जास्त कापूस लागवड क्षेत्र यावर्षी दिसून आले. सप्टेंबर पर्यंत पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादनात वाढ होवून शेतकºयांना यंदा अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र आॅक्टोबर महिन्याच्या सततच्या पावसामुळे या स्वप्नावर देखील पाणी फिरले. होत्याचे नव्हते होवून शेतकºयाच्या शेती पिकाचे नुकसान झाले. यात कापूस ओला झाल्यामुळे इच्छा नसताना नाईलजास्तव विक्री करावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापूस वेचणी काही दिवस थांबवली होती. मात्र आता काही दिवसापासून उघडीप दिल्यामुळे वाढती मजुरी देऊन वेचणीच्या कामाला सर्वत्र गती मिळाली असून कापसात काही प्रमाणात ओलावा दिसून येत आहे. म्हणून कमी दरात कापूस विक्री करण्याची शेतकºयांची यंदा मजबुरी आहे.नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरी येथील परिसरात किंवा दोंडाईचा बाजारपेठेत हक्काचे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. ओलावा जास्त असल्याने सीसीआयच्या निकषात कापूस बसत नाही. त्यामुळे जोपर्यंत १० टक्के पेक्षा आर्द्रतामुक्त कापूस बाजारात येत नाही तोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होणार नसल्याचे समजते. यामुळे हा ओला कापूस ठेवावा तरी कुठे, या विवंचनेतच खासगी व्यापाºयाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.सध्या येथून खासगी व्यापारी कापूस खरेदी करुन गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील बाजारपेठेत किंवा जिनर्सना विक्री करत असल्याचे समजते. यंदा कापसाची आवकही नसल्यामुळे हे व्यापारी किरकोळ व्यापाºयापासून खरेदी करतात. यामुळे तीन घटकांचा नफा वजा जाता हा भाव पदरात पडत असल्यामुळे कवडीमोल भाव मिळत आहे. यासाठी प्रशासनाने शेतकरी व जिनर्स या मधले दोन घटक बाजूला कापूस खरेदी करुन शेतकºयांना दिलासा द्यावा व हमीभावापेक्षा कमी भावाने कुठेही कापूस खरेदी होवू नये, यासाठी प्रयत्न करण्याची शेतकºयांची मागणी आहे.
ओलाव्याचे कारण सांगून कापूस खरेदीत लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:03 IST