देवपुरातील रस्ते सोमवारपासून दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 22:10 IST2020-06-05T22:09:51+5:302020-06-05T22:10:08+5:30
महापालिका : कामांची गुणवत्ता तपासूनच देयके अदा करा : बैसाणे

देवपुरातील रस्ते सोमवारपासून दुरुस्त
धुळे : भूमिगत गटारीच्या कामामुळे देवपुरातील बहुतांश रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे़ वर्दळीच्या रस्त्यांसह कॉलनी भागात देखील मोठी समस्या निर्माण झाली आहे़ सोमवारपासून संबंधित ठेकेदार रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेणार असून कामांची गुणवत्ता तपासल्यानंतरच त्याची देयके अदा करावीत असे निर्देश स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी बैठकीत दिले़
देवपुर भागात सर्वत्र भूमिगत गटार योजनेचे पाईप लाईन टाकणे, चेंबर बसविणे अशी विविध कामे सुरु होती़ सदर झालेल्या कामांमुळे देवपुर भागातील बहुतांश रस्ते सदरच्या कामांमुळे खोदण्यात आले होते़ त्यामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली होती़ नुकताच पावसाळा सुरु झाल्याने याबाबत नागरीकांच्या तक्रारीत वाढ होऊन त्यांचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते़ त्यामुळे या विषयाबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी बैठकीचे आयोजन केले होते़
या बैठकीत देवपूर भागातील नगरसेवकांनी तक्रारी मांडल्या़ यावर सभापती बैसाणे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना कामांच्या सद्यस्थितीबाबत व काम सुरु करण्याबाबत विचारणा करुन कारवाई करण्याचा इशारा दिला़ लॉकडाऊनमुळे शासनाचे आदेश असल्याने काम बंद होते़ त्यामुळे काम होऊ शकले नव्हते़ याबाबत सोमवारपासून रस्ते दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदारांमार्फत हाती घेण्यात येणार असून प्राधान्यक्रमांकाने रहदारी असलेले देवपुरातील प्रमुख रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला़ तसेच कामांची गुणवत्ता तपासून देयके अदा करावीत़ याबाबत महापालिकेशी समन्वय ठेवून दैनंदिन कामकाजाची पाहणी करावी़ ज्या कामांची गुणवत्ता नाही किंवा काम खराब झालेले आहे, असे काम पुनश्च दुरुस्त करावे़ रस्ते दुरुस्तीचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, असा प्रकारचा निर्णय बैठकीत घेण्यात आला़ तसेच नगरसेवकांनी संबंधित ठेकेदार किंवा महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांना कामांसंदर्भात तक्रारी केल्यास त्याबाबत त्यांना तात्काळ समाधानकारक खुलासा करावा, असेही बैठकीत आदेशित करण्यात आले़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, आयुक्त अजीज शेख, एमजीपीचे कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता पाटील, सहायक अभियंता धोत्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, ठेकेदार उपस्थित होते़