१५ दिवसांपासून रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 22:22 IST2020-07-22T22:21:50+5:302020-07-22T22:22:02+5:30
शिरपूर : प्रधानदेवी येथे पुल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील प्रधानदेवी येथील पुलावरील माती वाहुन गेल्याने १५ दिवसांपासून रस्ता बंद झाला आहे. यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. मात्र, अजूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची व्यथा गावकऱ्यांनी मांडली.
शिरपूर तालुक्याच्या उत्तरेला दुर्गम भागातील प्रधानदेवी गावालगत पाईप टाकून मोरी टाईप पूल बांधण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावालगतच्या नाल्याला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात येथील पुलावरील माती वाहुन गेली आहे. पुलाच्या पाईपवरील माती वाहुन गेल्याने मोठा खड्डा पडला आहे. यामुळे या दुर्गम भागातील गावाचा जवळच्या कळईपाणी व बोराडीकडील मुख्य गावांशी संपर्क तुटला आहे.
सदर घटनेबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली. परंतू १५ दिवस उलटूनही ग्रामसेवक किंवा कोणी अधिकारी याठिकाणी फिरकलेसुध्दा नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर पुलाचे काम चार महिन्यापुर्वीच रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले होते. पावसाळा सुरु होताच सर्व माती वाहुन गेली आहे. पहिल्या पावसातच पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या बाजुला काढलेला रस्ताही पावसाने वाहुन गेला आहे. यामुळे रात्री-बेरात्री पायी चालणे देखील कठीण झाले असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सदर रस्त्याची व पुलाची संबंधित अधिकाºयांनी त्वरित पाहणी करुन दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.