अवघ्या तासाभरात लागला निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 22:07 IST2020-12-03T22:07:01+5:302020-12-03T22:07:30+5:30
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूक

अवघ्या तासाभरात लागला निकाल
धुळे : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला. दोनच उमेदवार आमने-सामने आणि पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजूनच निकाल स्पष्ट होणार असल्याने मतमोजणी सुरु झाल्यावर अवघ्या तासाभरात निकाल स्पष्ट झाला. मात्र, निकालाची घोषणा जिल्हाधिकारी यांनी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास केली. त्यानंतर भाजप समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला.
सकाळी मतमोजणीला सुरुवात
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या नियोजन सभागृहात विधान परिषदेच्या मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहाही मतदान केंद्राच्या मतपेट्या एकत्र आणण्यात आल्या. सर्व मतपेढ्या फोडून त्यातील चिठ्यांची मोजणी करीत झालेले मतदान व प्राप्त झालेले मतदान याची खात्री करण्यात आली. त्यातील वैध व अवैध मते वेगवेगळी करण्यात आली. ४ मते अवैध तर ४३० मते वैध ठरविण्यात आली. त्यामुळे आयोगाच्या सुचनेनुसार वैध मते भागिले दोन अधिक १ या सुत्रांप्रमाणे विजयी उमेदवारांसाठी २१६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासून भाजपचे उमेदवार अमरिशभाई पटेल हे आघाडीवर राहिले. त्यानंतर अवघ्या तासाभरानंतर रेकॉर्ड ब्रेक मतमोजणी करुन निकाल घोषीत करण्यात आला. अवैध ठरलेल्या चार मतांपैकी दोन मतपत्रिका कोऱ्या तर दोन मतपत्रिकेवर चुकीच्या पध्दतीने मतदान केल्याने त्या बाद ठरविल्याचे सांगण्यात आले.
विजयाचा औपचारीक जल्लोष
मतमोजणीअंती भाजपचे उमेदवार अमरिशभाईंना ३३२ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना तीन आकडी संख्याही गाठता आली नाही. ९८ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. अमरिशभाई यांच्या विजयाची घोषणा होताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर समर्थकांनी फटाके फोडले.
वाहनांचा ताफा दाखल
विजयी झाल्याची बातमी कळाल्यानंतर अमरिशभाई पटेल आपल्या हिंतचिंतकांसोबत वाहनांच्या ताफाने दाखल झाले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार काशिराम पावरा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी आमदार डी. एस. अहिरे, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.