निर्बंधच बरे हाेते हो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST2021-08-19T04:39:35+5:302021-08-19T04:39:35+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. भाजी विक्रेते, फळविक्रेत्यांना ठराविक वेळेपर्यंतच व्यवसाय करण्याची मुभा होती. ...

निर्बंधच बरे हाेते हो..
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. भाजी विक्रेते, फळविक्रेत्यांना ठराविक वेळेपर्यंतच व्यवसाय करण्याची मुभा होती. नागरिकांनाही त्याचवेळेत मार्केटला जाऊन खरेदी करावी लागत होती. वेळेचे बंधन असल्याने, तसेच वस्तू हातोहात संपतील या भीतीने ग्राहकही विक्रेत्यांनी सांगितलेला दाम हमखास देत हाेते. त्यामुळे काही विक्रेत्यांची तर चंगळ होती. कडक निर्बंध त्यांच्यासाठी वरदान ठरले हाेते. यात अनेकांनी हात धुऊन घेतले. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शासनानेही उदारमनाने निर्बंध शिथिल काय जवळपास पूर्ण काढूनच टाकले आहेत. त्यामुळे पूर्वीसारखीच स्थिती झालेली आहे. ग्राहकांनाही आता संधी मिळाली. तेदेखील सायंकाळी उशिरापर्यंत बाजारात जाऊ लागले आहेत. एकतर ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते, त्यातच ग्राहकही काहीही दर सांगू लागल्याने, काही विक्रेत्यांचे दिवाळे निघू लागले आहेत. त्यामुळे निर्बंधच बरे होते, अशी कुजबूज विक्रेत्यांमध्ये सुरू झालेली आहे.
-अतुल जोशी