धुळे मनपातील भरती प्रक्रियेबाबतचा ठराव अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 13:56 IST2017-05-14T13:56:40+5:302017-05-14T13:56:40+5:30
महासभेचा ठराव अखेर निलंबित करण्यात आला असून येत्या महासभेत त्याबाबतचा विषय माहितीस्तव ठेवण्यात आला आह़े

धुळे मनपातील भरती प्रक्रियेबाबतचा ठराव अखेर रद्द
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 14 - महापालिकेत 2011 मध्ये झालेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत अनियमितता असतांना शासनाच्या पत्रानुसार भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यास महासभेने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती़ मात्र आयुक्तांनी सदर ठराव विखंडीत करण्याची मागणी केल्यानंतर महासभेचा ठराव अखेर निलंबित करण्यात आला असून येत्या महासभेत त्याबाबतचा विषय माहितीस्तव ठेवण्यात आला आह़े
महापालिकेने 2011 मध्ये सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती़ जाहिरातीत 20 पदे तोंडी मुलाखती घेऊन भरण्यात आली असून 11 पदांची भरती प्रक्रिया त्यावेळी प्रलंबित राहिली़ या सरळसेवा भरती अंतर्गत बागमाळी, मुकादम व फिल्ड वर्कर या 7 पदांसाठी 28 मे 2012 ला लेखी परीक्षा घेण्यात आली़ लेखी परिक्षेनंतर त्याच दिवशी मुलाखत ठेवण्यात आली होती़ तथापि, लेखी परिक्षेचे निकाल जाहीर होण्यास सायंकाळी 5 वाजल्यामुळे त्या दिवशी मुलाखती होऊ शकल्या नाहीत़ त्यानंतरही मुलाखतीची प्रक्रिया प्रलंबितच राहिली़ याबाबत 13 जानेवारी 2016 ला झालेल्या महासभेत ठराव करून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली होती़ मात्र आयुक्तांनी विविध बाबींचा संदर्भ देत ठराव विखंडीत करण्याची मागणी केली होती़ त्यानुसार शासनाने ठराव प्रथमत: निलंबित केला आह़े