टोलनाके अन् चौकाचौकात ‘थर्मल स्कॅनर’ची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:00 IST2020-03-18T13:00:15+5:302020-03-18T13:00:44+5:30
खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय : प्रत्येक घटकाची मदत महत्वाची

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी खूप महत्वाचे आणि कठोर निर्णय घ्यावे लागतात़ चीनमधील ज्या वुहान शहरामधून कोरोनाची सुरुवात झाली, ते शहर चीन सरकारने कुलूपबंद केले होते़ आपल्याला हे शक्य नसले तरी आपल्याकडे असलेले टोलनाके आणि शहरातील महत्वाच्या चौकात थर्मल स्कॅनर लावले तर कोरोना लवकर अटोक्यात आणणे शक्य होईल, असे मत आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे़
कोरोनाची साथ अटोक्यात आणण्यासाठी शासनाने गंभीर पाऊले उचलली आहेत़ धुळे शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे़ शिवाय लग्नसराई असल्यामुळे बाजारपेठेत आणि कार्यालयांमध्ये वर्दळ असते़ तसेच रेल्वेस्टेशन आणि खाजगी बसेसमुळे ये जा करणाऱ्यांची सकाळी आणि रात्री गर्दी असते़ संसर्ग होवून नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये थर्मल स्कॅनर लावण्याची गरज आहे़ तीन महामार्गांवर वसलेल्या या शहराच्या दुतर्फा टोलनाके आहेत़ शहरात येण्यासाठी किंवा शहरातून इतरत्र जाण्यासाठी टोलनाके ओलांडून जावे लागते़ अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे या टोलनाक्यांवर थर्मल स्कॅनर लावले तर ही साथ पसरण्यापासून रोखता येवू शकते़ कोरोनाच्या या धास्तीमध्ये थर्मल स्कॅनर हा सर्वाधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय ठरु शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे़
शासनाने लवकर पाऊले उचलली आहेत; पण पुढील दोन किंवा तीन टप्प्यानंतर या आजाराचा एकदम उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे़