मातंग समाजातील मृताची अंत्ययात्रा अडविल्याचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:22+5:302021-08-27T04:39:22+5:30
धुळे : मातंग समाजाची अंत्ययात्रा अडविल्याची संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून, या घटनेचे धुळे जिल्ह्यातही पडसाद उमटत आहेत. ...

मातंग समाजातील मृताची अंत्ययात्रा अडविल्याचे पडसाद
धुळे : मातंग समाजाची अंत्ययात्रा अडविल्याची संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून, या घटनेचे धुळे जिल्ह्यातही पडसाद उमटत आहेत. भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतर्फे नुकतीच निदर्शने करण्यात आली. अंत्ययात्रा अडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात मातंग समाजाचे पनाजी अनंता साठे यांची अंत्ययात्रा पाेलिसात दिलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून अडवण्यात आली. पाेलिसात दिलेली तक्रार मागे घेत असल्याचे लेखी द्या, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी मृताचे नातेवाईक साठे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. अंत्ययात्रा अडवण्याच्या ठिकाणी पाेलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पाेलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी उपस्थित हाेते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी हा प्रश्न सोडवण्याची गरज होती. पण त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. या प्रकरणी दाेषींवर कारवाई करावी, पीडितांना संरक्षण द्यावे, त्यांचे पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी, अधिकारांचा गैरवापर करणारे पाेलीस अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पानपाटील, प्रदेश सरचिटणीस महेंद्र खैरनार, नगरसेवक नागसेन बाेरसे, विनायक अहिरे, प्रकाश पाेळ, माेहित चित्ते, मनुकुमार गाेयर, वानखेडकर, गणेश आगलावे, विक्की थाेरात, बंटी मंगळे उपस्थित होते.
घटनेची सखोल चाैकशी करण्याची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात बोरगाव येथे मातंग समाजातील साठे नावाच्या व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील रस्त्याने त्यांची अंत्ययात्रा नेली जात असताना गावातील जातीयवादी मानसिकतेच्या काही लोकांनी अंत्ययात्रा रोखून धरली आणि मज्जाव केला. या घटनेचा गुरू रविदास विचार मंचासह मोची चर्मकार समाजाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेच्या सखोल चाैकशीची मागणी केली आहे. तसेच दोषींना त्वरित अटक करण्याचीही मागणी केली आहे. यावेळी कन्हैया शामलाल साखरे, रामेश्वर चत्रे, देवेंद्र जपसरे, विवेक जपसरे, हर्षल शिंदे, शिवा चत्रे आदी उपस्थित होते.