अवाजवी वीजबिल कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:26 IST2020-07-02T21:26:38+5:302020-07-02T21:26:57+5:30
लोकप्रतिनिधी : रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा

dhule
धुळे : ग्रामीण भागात आलेले अवाजवी वीजबिल कमी करावे या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ १५ दिवसांच्या आत वीजबिल कमी न केल्यास महामार्गांवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़
धुळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, जिल्हा परिषदेचे कुसूंबा गटाचे सदस्य संग्राम पाटील, शिरुड गटाचे सदस्य आशुतोष पाटील, समाधान पाटील, चेतन पाटील, सतीष अमृतसागर आदींनी गुरूवारी जिल्हाधिकारी, महावितरण कंपनी आणि धुळे तालुका पोलीस ठाण्यात निवेदन दिले़
धुळे तालुक्यातील कुसूंबा, गोताणे, आनंदखेडे, सुट्रेपाडा, उडाणे, कुंडाणे, सांजोरी, शिरुड, धामनगाव, बोधगाव, निमगुळ, खोरदड, मोरदड, कुंडाणेतांडा, बोरविहीर, जुनवणे, बोरकुंड, रतनपुरा या गावांसह इतरही गावांमध्ये लॉकडाऊन काळातील मागील तीन महिन्यांचे वीजबिल अवाजवी आले आहे़
येत्या १५ दिवसांच्या आत वाढीव वीजबिल कमी न केल्यास शिरुड आणि कुसूंबा येथे महामार्गांवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़ ग्रामीण जनता संतप्त आहे़