प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत फक्त एक हरकत प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:20 IST2019-11-06T11:20:20+5:302019-11-06T11:20:57+5:30
हरकत दाखल करण्याची आज शेवटची मुदत

प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत फक्त एक हरकत प्राप्त
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीवर मंगळवारी शिंदखेडा तालुक्यातील मौजे कलमाडी येथून एक हरकत दाखल करण्यात आलेली आहे. तर धुळे, साक्री व शिरपूर तालुक्यातून एकही हरकत दाखल झालेली नाही. ६ रोजी प्रारूप मतदार यादीवर हरकत व सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
धुळ्यासह राज्यातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुका विहित कालावधीत घेण्यासाठी ४ आॅक्टोबर २०१९ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्टÑ विधानसभा मतदार याद्यांचे पारंपारिक पद्धतीने निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय विभाजन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.२ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत शिंदखेडा तालुक्यातील मौजे कलमाडी येथील विजेंद्र पाटील यांनी शिंदखेडा तहसील कार्यालयात हरकत दाखल केली आहे. यात मौजे कलमाडी येथील प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये २०० नावे ही दुबार व बोगस असल्याचे दिसून आले आहे. ज्यांचा गावात काहीच संबंध नाही, गावात त्यांना कोणीही ओळखत नाही, अशांची नावे मतदार यादीत टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या संदर्भात शिंदखेडा येथील तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, एक हरकत प्राप्त झाली असून, ती नेमकी काय आहे, ते अद्याप बघितले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर उपजिल्हाधिकारी (प्रशासन) उन्मेश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, एकही हरकत प्राप्त नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. मतदार यादीवर हरकत घेण्याची बुधवारी शेवटची मुदत आहे.