राऊळवाडीतील चोरीप्रकरणी अवघ्या तीन दिवसात उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:24 IST2020-10-23T15:24:14+5:302020-10-23T15:24:54+5:30
तिघांना केले जेरबंद : शहर पोलिसांची कारवाई

dhule
धुळे : शहरातील चितोड रोडवरील राऊळवाडीत चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून घरगुती वापराचे दोन सिलेंडर, रोख रक्कम असे एकूण ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात गुन्ह्याची उकल करुन तिघांच्या मुसक्या आवळल्या़ त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमल देखील ताब्यात घेण्यात आला़
शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ चितोड रोडवरील राऊळवाडीत अलकाबाई हिरामण मासुळे (३५) यांचे घर आहे़ त्या २९ सप्टेंबरपासून कामांनिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या़ १८ आॅक्टोबर रोजी परत आल्यानंतर घराची जाळी त्यांना तुटलेली दिसून आली़ त्यांनी घरात जावून बघितल्यावर दोन घरगुती वापरायचे सिलेंडर आणि कपाटात ठेवलेले ४ हजार ३०० रुपये असा एकूण ९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे समोर आले़ याप्रकरणी अलकाबाई मासुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची सुत्र हलविली आणि शेखर भटू जाधव, मयूर अरुण कोळवले आणि सनी उर्फ संतोष विनायक सुपले यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे़
शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस कर्मचारी सुनील पाठक, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, अविनाश कराड यांनी ही कारवाई केली़