ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST2021-08-29T04:34:25+5:302021-08-29T04:34:25+5:30
आरोग्य यंत्रणेला सूचना देताना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना आजार आटोक्यात आल्यानंतर डेंग्यू, हिवताप, ...

ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती करा
आरोग्य यंत्रणेला सूचना देताना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना आजार आटोक्यात आल्यानंतर डेंग्यू, हिवताप, टाईफाॅईड असे विविध प्रकारचे साथीचे आजार पसरले आहेत. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. उशिरा आलेला किरकोळ पाऊस आणि त्यानंतर पुन्हा पावसाने मारलेली दडी यामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. त्यामुळे लहान मुलांसह सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सुटका होत नाही तोच अशाप्रकारे विविध साथीच्या आजारांमुळे सामान्य जनता आरोग्य आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्कपणे आरोग्य सेवा पुरवावी अशा सूचना आ. पाटील यांनी केल्या आहेत. धुळे तालुक्यासह शहर आणि जिल्हयात आरोग्य सेवा देणाऱ्या सरकारी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमित व अहोरात्र येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर वैद्यकीय सेवा द्यावी. अतिरिक्त आरोग्य यंत्रणा वापरून गावागावात आरोग्य शिबिरेही राबवावीत. ज्यामुळे सरकारी दवाखान्यात पोहोचू न शकणाऱ्या रुग्णाला घरपोच आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. दरम्यान, ग्रामीण भागात आरोग्य व तत्सम सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्याही सूचना आ. पाटील यांनी केल्या आहेत.
* नागरिकांना आवाहन
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला धुळे तालुका आणि जिल्ह्यातील जनतेने अत्यंत संयम दाखवत स्वत:ची काळजी घेतली. कोरोना योद्धा आणि आरोग्य यंत्रणेनेही जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधासाठी काम केले. त्यानंतर पुन्हा एकदा पसरलेले विविध प्रकारचे साथ रोग आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन जनतेने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. निरोगी राहण्यासाठी आरोग्याच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून कोरोना आणि साथरोगापासून दूर रहावे, असे आवाहनही आ. कुणाल पाटील यांनी केले आहे.