रब्बीतील गहू, हरबरा पेरणी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:59 IST2020-12-03T21:59:03+5:302020-12-03T21:59:23+5:30
मालपूर परिसरातील चित्र

रब्बीतील गहू, हरबरा पेरणी अंतिम टप्प्यात
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील गहु, हरभरा पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी भरण्यासाठी एकच धडपड सध्या शेतशिवारात दिसुन येत आहे. गायब झालेल्या थंडीचे देखील पुनरागमन हळूहळू होत आहे़ यामुळे शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत.
थंडी व रब्बी हंगाम यांचे अतुट नाते आहे. थंडीच्या जोरावरच या हंगामातील गहु, हरभरा ही पिके बहरत असतात. जेवढी जास्त थंडी तेवढे जास्त जोमाने ही पिके वाढीस लागतात असे येथील जाणकार शेतकरी सांगतात मात्र मागील आठवडात थंडी अचानक गायब झाल्याने येथील शेतकरी हिरमुसले झाले होते. दिवाळी आधीच यावर्षी मालपूर सह परिसरात थंडीने दस्तक दिली. यामुळे रब्बी हंगामातील कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. लागवडी योग्य क्षेत्र तयार करुन त्यावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने आधुनिक यंत्राच्या मदतीने पेरणी केली. हे काम येथे अंतिम टप्प्यात आहे. यानंतर उन्हाळ्यातील भुईमूग पेरणी कडे येथील शेतकरी वळत असतात त्यासाठी क्षेत्रफळ तयार करण्याच्या हालचाली काही ठिकाणी दिसुन येत असल्याचे चित्र आहे. येथील अमरावती मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा तसेच विहिरी व कुपनलिकांची वाढलेली पाण्याची पातळी लक्षात घेता रब्बीतील क्षेत्रफळात यावर्षी वाढ होणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे. या हंगामाला पाण्याची गरज असते व मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रफळात वाढ होणार यावरुन स्पष्ट होत आहे. गहू हरभरा या पिकांसह रांगडी कांदा मका या पिकांचा देखील काही क्षेत्रफळावर समावेश आहे. यासाठी देखील शेत मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर काही क्षेत्रफळावर ओलण्याचे काम दिसुन येत आहे.