सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST2021-01-16T04:39:52+5:302021-01-16T04:39:52+5:30
परमेपाडा येथील मतदान केंद्रावर सकाळपासून लांबलचक रांगा लागलेल्या दिसून आल्या. येथे शांततेत मतदान सुरू होते. तर लळिंग येथे सकाळपासूनच ...

सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा
परमेपाडा येथील मतदान केंद्रावर सकाळपासून लांबलचक रांगा लागलेल्या दिसून आल्या. येथे शांततेत मतदान सुरू होते. तर लळिंग येथे सकाळपासूनच मतदानासाठी जिल्हा परिषदेच्या केंद्रावर मतदानाची गर्दी झालेली होती. या ठिकाणी ओळखपत्र बघूनच मतदारांना मतदान केंद्राच्या आवारात सोडण्यात येत होते. या केंद्राच्या आवारात आरोग्य पथकही नियुक्त केलेले दिसले. ज्यांना उलट्या अथवा काही मळमळ होत असल्यास त्यांना तत्काळ गोळ्या देण्याची व्यवस्था केली होती. तसेच संशयास्पद वाटणाऱ्या मतदाराची थर्मल गनने तपासणी करण्यात येत होती. दुपारी १ वाजेपर्यंत बऱ्यापैकी मतदान झालेले होते. दरम्यान, या मतदान केंद्राच्या दोन्ही बाजूला २०० मीटरपर्यंत उमेदवार, समर्थक, अथवा ग्रामस्थांना थांबण्यास बंदी असतानाही अनेक जण मतदान केंद्राबाहेरच थांबलेले दिसून आले.
दिवाणामळा येथील मतदान केंद्रावरही मतदारांच्या रांगा होत्या. तसेच या ठिकाणी आरोग्य पथक दिसून आले नाही. पोलीसही मतदान केंद्रापासून थोडे लांब अंतरावरच बसलेले दिसून आले.
मोरशेवडी येथेही जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान झाले. मतदान केंद्रापेक्षा बाहेरच जास्त गर्दी दिसून आली. येथेही २०० मीटरची मर्यादा नावालाच दिसून आली. मतदान प्रतिनिधी जरी २०० मीटर रेषेच्या बाहेर बसलेले असले तरी ग्रामस्थांनी या केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली. मात्र पोलीस मतदान ओळखपत्र बघितल्याशिवाय कोणालाही आत सोडत नव्हते. या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड नसल्याचे मतदान अधिकाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी तीन खोल्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली असली तरी फक्त मतदान केंद्र क्रमांक २ मध्ये सर्वाधिक गर्दी होती. या ठिकाणी जवळपास ६०० पेक्षा जास्त मतदान असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील सडगाव येथे तर मतदान केंद्राच्या बाहेर यात्राच भरलेली आहे, असे चित्र होते. मतदान केंद्रावरही मतदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. मतदान केंद्र क्रमांक २वर सर्वाधिक गर्दी होती. मात्र या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. येथेही २०० मीटरची मर्यादा नावालाच दिसून आली.