बॅकेतून पैसे काढण्यासाठी ‘रांगा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:43 IST2020-04-07T12:43:21+5:302020-04-07T12:43:51+5:30
जनधन योजना । उदरनिर्वाहासाठी गरिबांना पाचशे रूपयांचा दिलासा

dhule
धुळे : जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी पहिल्याच दिवशी महिलांनी विविध बँकामध्ये प्रचंड गर्दी केली़ कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहासाठी गरीब महिलांच्या जनधन खात्यात दरमहा पाचशे रुपये जमा झाले आहेत़
दरम्यान, पैसे काढण्यासाठी वेळापत्रक दिले असून महिलांनी बँकांमध्ये गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनातर्फे शुक्रवारी करण्यात आले़ परंतु शनिवारी पहिल्याच दिवशी बँकामध्ये महिलांची गर्दी उसळली़ ‘सोशल डिस्टिन्सिंग’ नियमांचा पुरता फज्जा उडाला़ गर्दी आवरताना आणि गर्दीला शिस्त लावताना बँक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले़ त्यामुळे कोरोनाबाबत महिलांमध्ये गांभीर्य नसल्याचे जाणवले़
प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून जन- धन योजनेंतर्गत खाते असलेल्या महिल्यांच्या खात्यावर ५०० रुपये प्रति महिना या प्रमाणे पुढील तीन महिन्यांसाठी पैसे जमा केले जाणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिलांनी सोशल डिस्टन्सचा वापर करीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करीत बँकेत गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.