धुळे - जिल्ह्यातील कोविड केअर केंद्रांमध्ये चांगले जेवण मिळत असल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील वर्षी कोविड केअर केंद्रातील सुविधांबाबत मोठी नाराजी तेथील रुग्णांमध्ये दिसून आली होती. जेवणाचा दर्जा चांगला नसल्याची ओरड रुग्णांकडून होत होती. तसेच जेवण वेळेवर मिळत नाही, चहा वेळेवर मिळत नाही अशा तक्रारी समोर आल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र त्यात सुधारणा झाली आहे. कोविड केअर केंद्रातील जेवणाचा दर्जा चांगला असून चहा, नाश्ता वेळेवर मिळत असल्याचे कोविड केअर केंद्रातून उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही कोविड केअर केंद्रात मिळणाऱ्या सुविधांवरून रुग्णांनी नाराजी व्यक्त केली होती. शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील कोविड केअर केंद्रातील रुग्णांनी तर जेवणात मिळालेल्या कच्ची खिचडीवरून ठेकेदाराला जाब विचारला होता. जेवण उशिरा देत असल्याच्या करणावरूनही खडेबोल सुनावले होते व तो व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यानंतर तेथील ठेकेदाराला समज देण्यात आली होती.
जिल्हा रुग्णालयात मिळते सर्वात चांगले जेवण -
धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या जिल्हा रुग्णालयात सर्वात चांगले जेवण मिळत असल्याच्या प्रतिक्रिया तेथे उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी दिल्या. सकाळी वेळेवर चहा, नाश्ता मिळतो. तसेच जेवणाचा दर्जा देखील चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी अंडी व इतर प्रथिनेयुक्त पदार्थ दिले जातात तसेच दररोज रात्री दूध दिले जात असल्याची माहिती मिळाली. खाजगी रुग्णालयासारखे उपचार जिल्हा रुग्णालयात मिळाल्याची प्रतिक्रिया येथे उपचार घेतलेल्या एका रुग्णाने दिली.
सामोडे कोविड सेंटर -
सामोडे कोविड सेंटर येथे रुग्णांसाठी उत्तम व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती, नाश्ता, जेवण, गरम पाणी, पिण्याचे पाणी, आदी वेळेवर व चांगल्या प्रतीचे मिळत होते, स्वच्छता, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तपासणी नियमित होत. मी ६ दिवस तेथे असल्याने कुठलीही कमी मला वाटली नाही.
- पूजा सूर्यवंशी, पिंपळनेर
शिंगावे कोविड सेंटर -
शिंगवे कोविड केंद्रात ८ दिवस उपचार घेतले. वेळेवर जेवण, नाश्ता व चहा मिळत होता. तसेच याठिकाणी चांगले उपचार मिळाले. येथील सकारात्मक वातावरणामुळेच लवकर बारा झालो. जेवणाचा दर्जाही चांगला होता.
- सुनील पाटील, शिरपूर
भाडणे कोविड केअर सेंटर -
माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर भाडणे येथील कोविड केअर केंद्रात दाखल झालो होतो. त्याठिकाणी चांगले उपचार मिळाले. जेवण, चहा वेळेवर मिळत होते. डॉक्टर वेळोवेळी तपासणी करत होते.
-
बाफना कोविड सेंटर -
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर धुळे तालुक्यातील रुग्णांसाठी असलेल्या बाफना कोविड केअर केंद्रात उपचार घेतले. त्याठिकाणी चांगल्या प्रकारचे जेवण मिळत होते. तसेच वेळोवेळी फळेही मिळत होती.
-
जिल्ह्यातील कोविड केअर केंद्रांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णांना चांगल्या प्रकारचे जेवण दिले जाते. त्यांना जेवणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रथिने कसे मिळतील याकडे लक्ष दिले जाते. तसेच नाश्ता, चहा वेळेवर देण्याबाबत सूचना केल्या आहेत. तरीही जेवणाच्या दर्जाबाबत रुग्णांची तक्रार असल्यास तात्काळ ती दूर केली जाईल.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी