रुग्णालयांना जनआरोग्यचे वावडे; दोन टक्के रुग्णांनाच मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST2021-05-18T04:37:08+5:302021-05-18T04:37:08+5:30
धुळे - जिल्ह्यातील रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी केवळ दोन टक्के ...

रुग्णालयांना जनआरोग्यचे वावडे; दोन टक्के रुग्णांनाच मोफत उपचार
धुळे - जिल्ह्यातील रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी केवळ दोन टक्के रुग्णांनाच जनआरोग्य योजनेचा लाभ झाला आहे. मागील वर्षभरापासून आतापर्यंत ८५० कोरोनाबाधित रुग्णांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार घेतल्याची माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सागर माळी यांनी दिली.
कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च आला आहे. कोरोना आजारावरील उपचार जनआरोग्य योजनेत केले जातील, असे शासनाने स्पष्ट केले होते. मात्र, तरीही रुग्णांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी केवळ दोनच टक्के रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्हाभरात २० रुग्णालयांत जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार मिळतात. त्यात १५ खाजगी तर ५ शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. १५ खाजगी रुग्णालयांपैकी धुळे शहरात १३ रुग्णालये आहेत. १६ हजार ९५७ प्रकारच्या विविध आजारांचे उपचार जनआरोग्य योजनेत केले जातात. त्यात कोरोनाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या खूप कमी रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला आहे. जास्त बिल आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयांच्या अनेक तक्रारी मनपाच्या ऑडिट कमिटीकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्णांनी अवाच्या सव्वा रक्कम भरली आहे.
कोरोनासाठी २० प्रकारचे पॅकेज उपलब्ध
- कोरोना आजाराचा समावेश महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे.
- कोरोनासाठी २० प्रकारचे वेगवेगळे पॅकेज करण्यात आले आहेत, अशी माहिती योजनेच्या जिल्हा समन्वयकांनी दिली.
- २० हजारांपासून ६५ हजार रुपयांच्या पॅकेजचा त्यात समावेश आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असे वेगवेगळे पॅकेज आहेत.
अशी करा नोंदणी -
या योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांमार्फत नोंदणी करता येते. कागदपत्रे जवळ नसतील तरी उपचार करून नंतर कागदपत्रे देता येतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड व आधार कार्डची आवश्यकता असते. रुग्णाला दाखल करून पाच दिवसांपर्यंत कागदपत्रे जमा करू शकता.
तर करा तक्रार -
महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असूनही लाभ मिळत नसेल तर रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक त्याबाबत रुग्णालयातील आरोग्य मित्राकडे तक्रार करू शकतात. हेल्पलाइन क्रमांक व जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण समितीकडेही तक्रार करू शकतात.
शेती विका, व्याजाने पैसे काढा; पण पैसे भरा -
१ - अनेक रुग्णांना व्याजाने पैसे काढून, जमिनी गहाण ठेवून रुग्णालयाचे पैसे भरावे लागले आहेत. १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत एका कोरोनाबाधित रुग्णाला खर्च आला आहे. जनआरोग्य योजनेचा लाभ न मिळाल्याने त्यांना ही रक्कम भरावी लागली आहे.
२ - धुळे शहरातील एका रुग्णाचे तब्बल ५ लाख रुपये बिल आले होते. रुग्णालयाचे पैसे भरण्यासाठी या रुग्णाला चक्क आपला प्लॉट विकावा लागला आहे. तब्येत अधिक खराब झाली होती तसेच योजनेतील उपचारांबाबत माहिती नव्हती. तसेच योजनेत उपचार मिळावे यासाठी आग्रह धरला असता तर रुग्णालयाने दाखल करून घेतले नसते, अशी परिस्थिती होती. त्यामुळे प्लॉट विकावा लागल्याचे त्या रुग्णाने सांगितले.
३ - रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी साक्री तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपली जमीन गहाण ठेवावी लागली आहे.