दादासाहेब गायकवाड अध्ययन केंद्रासाठी जागा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:39+5:302021-07-20T04:24:39+5:30
धुळे : येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुउद्देशीय शैक्षणिक, सांस्कृतिक अध्ययन केंद्र बेकायदा निष्कासित केल्यानंतर पर्यायी जागा उपलब्ध असताना देखील ...

दादासाहेब गायकवाड अध्ययन केंद्रासाठी जागा द्या
धुळे : येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुउद्देशीय शैक्षणिक, सांस्कृतिक अध्ययन केंद्र बेकायदा निष्कासित केल्यानंतर पर्यायी जागा उपलब्ध असताना देखील पुनर्वसनासाठी महानगरपालिका जागा देत नसल्याचा आरोप आंबेडकरी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. अध्ययन केंद्रासाठी पर्यायी जागा देण्याचे आदेश पालिकेला द्यावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या नगरविकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी आणि तत्कालीन नगरपालिकेच्या आदेशाने कायदेशीर प्रक्रियेतून ९९ वर्षांच्या करारावर अध्ययन केंद्रासाठी जागा मिळाली होती. महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळ असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून सन १९८१ ते २०१७ पर्यंत समाजकार्य सुरू होते. परंतु राजकीय व जातीय द्वेषापोटी अध्ययन केंद्राची इमारत निष्कासित केली. भरपाई देऊन पूनर्वसन केल्याशिवाय इमारत तोडू नये, असे नगरविकास विभागाचे आदेश असताना या आदेशाची पायमल्ली करून इमारत तोडण्यात आली.
निवेदन देताना ज्येष्ठ नेते एम.जी. धिवरे, एस. यू. तायडे, हरिचंद्र लोंढे, सुरेश लोंढे, रत्नशील सोनवणे, सिध्दार्थ साळवे, हिरेन मोरे, संजय सरदार, शिवाजी जमदाळे, साहेबराव दहिहंडे आदी उपस्थित होते.
पर्यायी जागा उपलब्ध
शहरातील झाशी राणी चाैकातील प्रबोधनकार ठाकरे संकुलात जागा शिल्लक आहे. तसेच मनपाच्या जुन्या इमारतीच्या बोळीत जागा शिल्लक आहे. त्याठिकाणी वास्तू बांधून द्यावी. बोळीतील रिकाम्या निरुपयोगी जागेवर सुमारे ४४ लाख रुपये खर्च करून खाऊ गल्लीच्या नावाने केवळ भिंत उभी केली आहे. त्यातून केवळ ४५० चाैरस फूट जागा आणि १५ लाख रुपये भरपाई दिल्यास संस्थेच्या पुनर्वसनाला कोणतीही अडचण नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.