शेतकरी, शेतमजुरांना लखपती बनविणार समृध्दी बजेट मी समृध्द, तर गाव समृध्द : खर्च वजा जाता १ लाख उत्पन्नासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:32+5:302021-07-15T04:25:32+5:30
धुळे : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘मी समृध्द, तर गाव समृध्द’ ही योजना हाती घेतली ...

शेतकरी, शेतमजुरांना लखपती बनविणार समृध्दी बजेट मी समृध्द, तर गाव समृध्द : खर्च वजा जाता १ लाख उत्पन्नासाठी प्रयत्न
धुळे : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘मी समृध्द, तर गाव समृध्द’ ही योजना हाती घेतली आहे. शेतकरी, शेतमजुरांना लखपती बनविण्यासाठी गावनिहाय समृध्दी बजेट तयार केला जाणार आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांना सर्व खर्च वजा जाता वर्षाकाठी १ लाख रुपये निव्वळ नफा मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
‘मी समृध्द तर गाव समृध्द’ योजनेअंतर्गत प्रत्येक गावाचा अभ्यास करून २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी गावनिहाय समृध्दी बजेट तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. बजेट तयार करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी, यंत्रणांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी योजनेचा प्रारंभ होणे अपेक्षित आहे. त्यानंतर गावफेरी, शिवारफेरी काढून योजनेची जनजागृती करीत सर्व घटकांना यात सहभागी करून घेतले जाईल, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी ‘लोकमत’ला दिली.
आतापर्यंत रोहयोमधून फक्त रोजगाराकडे किंवा मजुरीकडे लक्ष दिले गेले; परंतु आता लेबर बजेटला समृध्द बजेट करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. राहेयोमधून कोणती कामे घ्यावीत, याचा निर्णय ग्रामपंचायत घेत असे. पंरतु आता शेतकरी, शेतमजूर, गावकऱ्यांशी चर्चा करून तसेच गावांचा सर्व्हे करून लेबर बजेट तयार होईल. या बजेटला पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर कामे सुरू होतील.
प्रती एकर १ लाख उत्पन्नासाठी प्रयत्न
शेतकरी कुटुंबाला लखपती करण्यासाठी पीक पध्दतीत बदल करणे, शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहण्यासाठी मानसिकता तयार केली जाणार आहे. त्यासाठी विकेल ते पिकेल, ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण तसेच राेहयोच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील.
शेतमजुरांची मालमत्ता तयार करण्यासाठी प्रयत्न
ग्रामीण भागातील मजूर रोजगारासाठी महानगरांकडे स्थलांतरित होतात. त्यामुळे त्यांना केवळ मजुरी मिळते, पण मालमत्ता तयार होत नाही. पंरतु त्यांना गावपातळीवरच रोहयोच्या सर्व २६२ कामांची माहिती देऊन रोजगार किमान १०० दिवस काम उपलब्ध करण्यात येईल. त्यामुळे त्यांच्याकडे मालमत्तादेखील निर्माण होईल. या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
गावाचा माथा ते पायथा विकास
‘कुटुंब समृध्द, तर गाव समृध्द’ अशी शासनाची संकल्पना आहे. कुटुंब समृध्द करण्यासाठी गावात रोहयोतून विकासाची कामे घेऊन गावाचा माथा ते पायथा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिक्षण, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, शेतमाल साठविण्यासाठी गोदाम, मृदा व जलसंधारणाची कामे, सिचंन पध्दती, बाजारपेठे, सेंद्रीय शेती आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.