नीट परीक्षा आवश्यकच, पण अभ्यासक्रम एकच असावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:35+5:302021-09-17T04:42:35+5:30
भूषण चिंचोरे धुळे - वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही पूर्वपरीक्षा घेणे आवश्यक आहे. पण पूर्ण देशभरातील अभ्यासक्रम एकच ...

नीट परीक्षा आवश्यकच, पण अभ्यासक्रम एकच असावा !
भूषण चिंचोरे
धुळे - वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही पूर्वपरीक्षा घेणे आवश्यक आहे. पण पूर्ण देशभरातील अभ्यासक्रम एकच असावा असे मत धुळ्यातील शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
तामिळनाडू राज्याने नीट परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असल्याचे सांगितले आहे. तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाबाबत शिक्षण तज्ज्ञ व विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. काही विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा घेऊ नये तर काहींनी परीक्षा घ्यायला हवी असे मत मांडले.
राज्यातील अभ्यासक्रमापेक्षा नीट परीक्षेचा अभ्यासक्रम अधिक व्यापक असतो. या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये सुसंगतपणा आणणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या परीक्षेचा विद्यार्थी व पालक अधिक ताण घेतात. अनेक विद्यार्थी दबावात ही परीक्षा देत असतात. नीटची परीक्षा तणावमुक्त वातावरणात व्हायला हवी तसेच परीक्षेसाठी केला जाणारा खर्च व दबाव दोन्ही कमी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय ?
नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू राज्यातील विधानसभेत मांडले गेले आणि संमत ही झाले. सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत.
धक्कादायक निर्णय
वैद्यकीय शिक्षणासाठी नीट परीक्षा आवश्यक आहे. मात्र त्यात काही बदल होणे आवश्यक आहेत. बारावीचा अभ्यासक्रम व नीट परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आहे. नीट परीक्षेसाठी संपूर्ण देशातील बारावीचा अभ्यासक्रम एकच असावा.
डॉ. प्रा. पी. एच. पाटील
प्राचार्य, जयहिंद महाविद्यालय
वैद्यकीय शिक्षणासाठी पूर्व परीक्षा आवश्यकच आहे. पण विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे दडपण घेऊ नये. या परीक्षेसाठीचा खर्च व तणाव दोन्हीही कमी झाले पाहिजेत. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी.
डॉ. प्रा. एम. व्ही. पाटील
प्राचार्य, घोगरे महाविद्यालय
नीट ही राष्ट्रीय स्तरावरची एक महत्त्वाची परीक्षा आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्या सर्वांनाच प्रवेश मिळणे शक्य नाही. चाळणीचे कमी ही परीक्षा करत असल्याने महत्त्वाची आहे.
- संघर्ष पवार, विद्यार्थी
नीट ही परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे सोपे जाते. ही परीक्षा पारदर्शकपणे घेतली जाते. राज्याच्या स्तरावर अशी परीक्षा झाली तर पारदर्शकपणे होणार नाही असे वाटते.
- सृष्टी सूर्यवंशी, विद्यार्थी