सैय्यदनगरला यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:00 IST2020-02-01T12:59:51+5:302020-02-01T13:00:27+5:30
तगतरावाची उत्साहात मिरवणूक : दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : साक्री तालुक्यातील सैय्यदनगर येथे ग्रामदैवत मरीमाता यात्रोत्सवाला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्याने तगतरावची मिरवणूक काढण्यात आली. सैय्यदनगर येथे गुरुवार ३० रोजी ग्रामदैवत मरीमाता मंदिराला श्रीफळ वाहून व प्रदिक्षणा घालून यात्रेला सुरुवात झाली.
यात्रा उत्सवानिमित्ताने भाविकांनी नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी चार वाजता गावातून तगतरावची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यंदा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सावट असतानाही यात्रोत्सवात उत्साह दिसून आला. या यात्रेचे वैशिष्ठ्य म्हणजे घरोघरी बोकडाची मान मानले जाते. प्रत्येक नातेवाईकास या यात्रेस बोलविले जाते आणि नवस फेडण्यात येतो. यात्रा परिसरात संसारोपयोगी साहित्य, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, ज्वेलरी, कटलरी यासह मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. रोजगारानिमित्त बाहेरगावी असणारे सैय्यदनगर येथील रहिवासी ग्रामदैवत मरीमातेच्या यात्रोत्सवासाठी गावी परतल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी शालीग्राम शांताराम रोहिणी भोईटीकर यांचा लोकनाट्य आयोजित करण्यात आले होते.