आमळी येथे आजपासून यात्रोत्सवास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:07 IST2019-11-08T12:07:07+5:302019-11-08T12:07:56+5:30
कन्हैयालाल महाराज : यात्रेत होते लाखोंची उलाढाल, मंदिर ट्रस्टसह ग्रामपंचायत प्रशासन सज्ज

dhule
दहिवेल : साक्री तालुक्यातील आमळी येथील प्रसिद्ध श्री कन्हैय्यालाल महाराज यात्रोत्सवास शुक्रवापासून प्रारंभ होत आहे. त्या साठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर परिसर रोशणाईने झगमगला आहे. एसटी महामंडळातर्फे जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
या यात्रोत्सवाला केवळ राज्यातीलच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश या नजीकच्या राज्यातूनही भाविक बहुसंख्येने सहभागी होतात. यात्रेकरीता ग्रामस्थांसह व्यावसायिक वर्ग एक महिना आधीपासून तयारीला लागतात. यात्रोत्सवाला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने पहाटेपासूनच दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसरासह दर्शनाच्या रांगा लागतात. मंदिर परिसरासह यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गर्दीमुळे हॉटेल सजली असून पाळणे, लोकनाट्य (तमाशा), खेळांचे साहित्य व फळांच्या दुकानांवरही गर्दी दिसत आहे.
व्यावसायिकांनी यात्रोत्सवात विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली असून भाविकांचे आगमन होण्यास सुरूवातही झाली आहे. ग्रा.पं.ने पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांसह उत्सवासाठीच नियोजन ग्रामसभा घेऊन केले आहे. यात्रेनिमित्त जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, वीज वितरण कंपनीने पूर्णपणे तयारी केली आहे.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पिंपळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, यांनी आमळीला भेट देऊन यात्रोत्सवाच्या परिसराची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन केले. वीज महावितरण कंपनीतर्फे सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संपूर्ण खान्देशातून यात्रोत्सवात हजारो भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून शुक्रवारी झुंबड उडण्याची शक्यता आहे.