‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत गावे निवडीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:06+5:302021-05-07T04:38:06+5:30

धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मी समृद्ध, ...

The process of selecting villages has started under the scheme 'I am prosperous, but the village is prosperous' | ‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत गावे निवडीची प्रक्रिया सुरू

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत गावे निवडीची प्रक्रिया सुरू

धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेसाठी जिल्ह्यातील गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना तहसीलदारांना केल्या आहेत, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी दिली.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेत प्रत्येक तालुक्यात दहा गावांची निवड करावी, अशा सूचना नाशिक विभागाचे रोहयो उपायुक्त अर्जुन चिखले यांनी दोन महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कामांची आढावा बैठकदेखील झाली होती. रोहयो उपायुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीला रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खोतकर, पंचायत समितीचे सर्व गट विकास अधिकारी, उपवनसंरक्षक भोसले, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी कुलकर्णी यांच्यासह यंत्रणेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रोहयो कामांचा तालुकानिहाय आणि कामनिहाय आढावा घेण्यात आला. नवीन कामांना मंजुरी देणे, अपूर्ण कामे पूर्ण करणे, तपासण्या, तक्रारी, जीओ टॅगिंग आदींबाबत सूचना देऊन नियमाप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेत प्रत्येक तालुक्यात १० गावांची निवड करून रोहयोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश यंत्रणेला दिले होते. त्यानुसार धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्रीसह सर्व तहसीलदारांना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राेहयो उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे. गावांची निवड करण्याची प्रक्रिया तालुका स्तरावर सुरू असली तरी निवड केलेल्या गावांची यादी अजून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत रोहयोच्या माध्यमातून गाय व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग उभारणे, पशुधन गटांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

Web Title: The process of selecting villages has started under the scheme 'I am prosperous, but the village is prosperous'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.