पोलीस असल्याची बतावणी, मांडळ शिवारात वृध्दाला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 21:37 IST2020-12-06T21:37:05+5:302020-12-06T21:37:43+5:30
१ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा ऐवज घेऊन पोबारा

पोलीस असल्याची बतावणी, मांडळ शिवारात वृध्दाला गंडविले
धुळे : पोलिसांचे ओळखपत्र दाखवत दोघांनी एका वृध्दाला गंडा घालत त्याच्याकडील दागिने आणि घड्याळ असा १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना शिरपुरातील मांडळ शिवारात रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ४ वाजता दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.
शिरपूर शहरातील मांडळ शिवारात असलेल्या हॉटेल साहेबा समोरुन दिलीप भभुतराव भैरव (५९, रा. महालक्ष्मी कॉलनी, शिरपूर) हे वृध्द पायी जात होते. रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यावेळेस रस्त्यावर कोणीही नव्हते. ही संधी साधून दोन जण एका दुचाकीने या वृध्दाजवळ आले. आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करुन पोलीस उपनिरीक्षकांचे ओळखपत्र त्या वृध्दाला दाखविले. त्यानंतर सुरक्षितता म्हणून तुमच्याकडील दागिने आणि जी काही मौल्यवान वस्तू असेल ती आमच्याकडे द्या अशी बतावणी केली. पोलीस असल्याने त्या वृध्दाने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत सोन्याचे दागिने आणि घड्याळ असा एकूण १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा ऐवज सुपूर्द केला. ऐवज मिळताच क्षणार्धात दोघा भामट्यांनी पळ काढला. बराचवेळ होऊनही ते दोघे परत आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिलीप भैरव यांनी शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दोघा विरुध्द भादंवि कलम ४२०, १७०, १७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल यू. जी. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.