धुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 22:19 IST2020-06-02T22:19:10+5:302020-06-02T22:19:31+5:30
४७ मीलीमीटर पावसाची नोंद : धुळ्याच्या तापमानात एकाच दिवसात १३.६ अंशाने घसरण

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : निसर्ग चक्रीवादळामुळे धुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे़ जिल्ह्यात ४७ मीलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी ११.७५ मीलीमीटर पाऊस झाला आहे़
धुळे तालुक्यात ९, साक्री २, आणि शिंदखेडा सर्वाधिक ३६ मीलीमीटर पाऊस झाला़ शिरपूर तालुक्यात पावसाची नोंद झाली नाही़ ही आकडेवारी सोमवारी रात्री झालेल्या पावसाची असून मंगळवारी दिवसभर देखील जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या़ शिरपूर तालुक्यात सोमवारी रात्री पाऊस झाला नसला तरी मंगळवारी मात्र दिवसभर तुरळक पाऊस सुरू होता़
धुळे जिल्ह्याच्या दिशेने येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे धुळ्याचे नभांगण ढगाळ झाले असून पाऊसही सुरू आहे़ त्यामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे़ धुळ्याच्या तापमानात एकाच दिवसात १३.६ अंशाने घसरण झाली आहे़ सोमवारी ४१ अंशावर असलेला तापमानाचा पारा मंगळवारी २७.४ अंशापर्यंत खाली घसरला आहे़ त्यामुळे उन्हाची आणि उकाड्याची तीव्रता कमी होवून नागरिकांना दिलासा मिळाला आहे़
धुळे शहरासह जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण होते़ सायंकाळी पावसाचा शिडकाव सुरू होता़ परंतु रात्री साडेअकरानंतर पावसाने अचानक जोर पकडला़ धुळे शहर आणि परिसरात दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला़ त्यानंतर रात्रभर अधून मधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या़ धुळे तालुक्यातील वडजाईसह परिसरात सलग १५ मिनिटे पाऊस सुरू होता़ शिंखेडा तालुक्यातील मालपूर येथे तुरळक हलक्या सरींना सुरूवात झाली होती़ साक्री तालुक्यातील कासारे आणि परिसरात देखील ढगाळ वातावरण कायम होते आणि तुरळक पाऊसाचा शिडकाव होत होता़ अचानक आलेल्या पावसामुळे न्याहळोद परिसरात धान्य, कांदा, चारा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली़ नेरसह परिसरातील गावांमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या़
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात वीजेचा लपंडाव कायम आहे़ सोमवारी मध्यरात्रीपासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे़ काही भागात तर रात्रभर वीजेचा लपंडाव कायम होता़ त्यामुळे नागरिक हैराण झाले होते़ दरम्यान, चार तारखेला चक्रीवादळ धुळे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे़
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
नेर : नेरसह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. तर अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविषयी नागरिक आणि शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे वीज कंपनीविरोधात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दिवसा आणि रात्रीही वीज पुरवठा केव्हाही खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. वीज कंपनीच्या कार्यालयात फोन केल्यावर समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तो सतत केव्हाही खंडित केला जात आहे. त्यामुळे सर्वच जण त्रस्त झालेले आहेत.
सोमवारी रात्री साडेअकरानंतर शहरासह जिल्ह्यात काही भांगामध्ये पाऊस सुरु झाला़ त्यानंतर धुळे शहरासह परिसरात रात्री तीन ते चार वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला़ काही भागात रात्रभर वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली़
मान्सूनपूर्व पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली़ गळक्या छतांवर अंथरण्यासाठी, शेतीमाल झाकण्यासाठी प्लॅस्टीकचे आवरण आणि जुने डीजीटल बॅनर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती़