सामुहीकपणे प्रार्थना करणारे ३७ ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:50 IST2020-04-03T21:49:51+5:302020-04-03T21:50:11+5:30
कोरोनाचा धसका : जालनाच्या एसआरपी जवानांनी घेतला धुळ्याचा ताबा, कारवाईला सुरुवात

सामुहीकपणे प्रार्थना करणारे ३७ ताब्यात
धुळे : शहरातील जुने धुळे परीसरातील आदर्श व्यायाम शाळा जवळ शुक्रवारी दुपारी संचारबंदी लागू असताना एका प्रार्थना स्थळावर सामूहिकरित्या गर्दी करणाऱ्या ३७ नागरीकांना आझादनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, धुळे शहरासह जिल्ह्यात बंदोबस्तासाठी जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या धुळ्यात गुरुवारी रात्री दाखल झाल्या़ त्यापैकी दोन तुकड्या धुळे शहरात तर एक तुकडी शिरपूर येथे शुक्रवारी तैनात करण्यात आली़
कोरोना संसर्गजन्य विषाणु असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्याची लागण होण्याची शयक्यता असते. याकरीता नागरीकांनी एकाच ठिकाणी जास्त संख्येने गोळा होऊ नये यासाठी धार्मिक प्रार्थनास्थळे बंद करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले होते. मात्र या आदेशाला हरताळ फासत शुक्रवारी जुने धुळे परीसरातील आदर्श व्यायाम शाळा जवळील एका धार्मिक स्थळावर नागरीक मोठ्या संख्येने प्रार्थना करण्यासाठी दाखल झाल्याची माहिती आझाद नगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धार्मिक स्थळाची तपासणी असता तेथे पोलिसांना एकुण ३७ नागरीक दिसुन आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझाद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सय्यद, रोशन निकम, पोलीस कर्मचारी चेतन सोनवणे, सागर सोनवणे, महेश मोरे, रमेश गुरव, अविनाश वाघ यांच्यासह रॅपीड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी केली. दरम्यान, अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते़ पोलीस देखील तैनात करण्यात आले होते़
ही कारवाई झाली तेव्हा प्रार्थना स्थळ परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता़ परंतु पोलिसांनी वेळीच त्यावर नियंत्रण मिळविले़
सदर घटनेनंतर जुने धुळे परिसरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे़ त्याची अंमलबजावणी धुळ्यात होऊ लागली आहे़ संचारबंदी असल्याने कोणत्याही भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी धुळ्यात तैनात करण्यात आलेली आहे़
लॉकडाऊनमुळे जमावबंदी आणि संचारबंदी लागू असतानाही धुळेकर रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे़ धुळे जिल्हा पोलीस दल शक्य तितकी सक्ती करुनही विनाकारण रस्त्यावर येणाºया जाणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कुठल्याही प्रकारचे कारण सांगून धुळेकर रस्त्यावर येत असल्याने त्यांना रोखण्यासाठी जालना येथील राज्य राखीव पोलीस दल अर्थात एसआरपीएफची एक कंपनी ४ अधिकाºयांसह धुळ्यात दाखल झाली आहे़ त्यांनी शहरातील महत्वाच्या रस्त्यावर नाकाबंदी सुरु केली आहे़ मास्क न लावता अनावश्यक फिरणाºयांना अंगावरील कपडे काढून त्याचा मास्क लावण्यास या जवानांनी भाग पाडले़ तर कुठलाही जातीभेद, धर्मभेद न करता चुकणाºयास खडे बोल सुनावण्याचे धारिष्ट्य एसआरपी जवानांकडून दाखविले जात होते़ शहरातील संतोषी माता चौक, पाच कंदिल, लोकमान्य हॉस्पिटलचा परिसर, पारोळा रोड, साक्री रोड, दत्त मंदिर यासह विविध वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय करण्यात आले़ पोलिसांकडून वाहने जप्त करण्यात आले़ विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांविरुध्द गुन्हेही दाखल करण्यात आले़ तरीही गर्दी नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जालना येथील एसआरपीची एक कंपनी अर्थात ९० कर्मचारी ४ अधिकाºयांसह धुळ्यात दाखल झाली आहे़ कंपनी दाखल होताच त्यांची वर्गवारी करण्यात आली़ त्यांनी सावरकर पुतळा, लोकमान्य हॉस्पिटल, बारापत्थर, संतोषी माता चौक, पारोळा रोड आदी वर्दळीच्या ठिकाणाचा ताबा घेतला़ येणाºया प्रत्येकाची त्यांच्याकडून चौकशी आणि संबंधितांचे ओळखपत्र तपासले जात होते़ खरोखरच संबंधितांचे घराबाहेर निघणे योग्य असल्याची खातरजमा केली जात होती़ यात अनावश्यक फिरणारे सापडल्यानंतर त्यांना काठीचा प्रसाद दिला जात होता़ हे दूरुनच पाहणाºयांनी आपला मार्ग वळून घेतल्याचे दिसून आले़
़़़ आणि अधिकाºयांनी भरला दम
धुळेकर नागरीकांनी उठसूट छोट्या छोट्या गोष्टींसाठी रस्त्यावर येऊन पोलीस आणि एसआरपीला विनाकारण कारवाई करण्यास भाग पाडू नये़ घराजवळ भाजीपाला, किराणा दुकान, औषधांचे दुकान, दूध डेअरी असताना घरापासून दूरवर वाहनाने येऊन स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालू नका़ वारंवार सांगूनही तुम्हाला कळणार नसेल तर नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागेल असा दमच जवानांनी भरला़ दरम्यान, जालना येथील एसआरपीच्या कंपनीतील २ तुकड्या धुळ्यात तर एक तुकडी शिरपूरला रवाना झाली आहे़
शासनाची बंदी असूनही सामुहीकपणे नमाज पठन करण्यासाठी एकत्र आल्यामुळे ३७ जणांना ताब्यात घेण्यात आले़ वरिष्ठांच्या सल्लानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल़
- दिनेश आहेर, आझादनगर पोलीस निरीक्षक, धुळे