रस्तादुरुस्तीसाठी आंदोलनाचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:41 IST2019-11-19T11:40:44+5:302019-11-19T11:41:14+5:30
नरडाणा येथे अडीच महिन्यांपासून प्रश्न कायम : दुरुस्तीसाठी दिली आठ दिवसांची मुदत

Dhule
नरडाणा : येथील उड्डाणपुलाजवळ बायपास जवळून जाणाऱ्या महामार्गावर गतिरोधक बसवा, पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करा, रस्त्याकडेला साचलेली वाळू उचलावी उड्डाणपुलावरील लाईट सुरु करण्यात यावेत तसेच रस्त्याच्या मध्यभागी गुरे चारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत. या संदर्भात सोमवारी पोलिसांना निवेदनही सादर करण्यात आले. त्यात मागण्यांची तड न लागल्यास अचानक रास्तारोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गावाजवळून जाणाºया मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर गेल्या ३१ आॅगस्ट रोजी डांबरचे ड्रम घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला होता. तीन दिवसांनंतर हा ट्रक जागेवरून उचलण्यात आला. तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक ही दुसरीकडून वळविण्यात आली होती. याच तीन दिवसांच्या कालावधीत याच ठिकाणी अजून एक ट्रक पलटी झाला होता. येथील उड्डाणपूल व हा रस्ता दोषपूर्ण आहे. १९९६ मध्ये आयुष्य अजय कन्स्ट्रक्शन कंपनीने गावात जाण्याच्या उद्देशाने बनवले होते. त्या नंतर २०१४ मध्ये आलेल्या सदभाव इंजीनियरिंग कंपनीने उड्डाणपुलाच्या व रस्त्याच्या कामात कोणताही बदल न करता या रस्त्याला काटकोनात वळवून गावाबाहेरुण जाणाºया बायपासला जोडून देण्यात आले. त्यानंतर याच उड्डाणपुलाजवळ आजपर्यंत शेकडो अपघात होऊन अनेक निरपराध प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाले.
बनले अपघातस्थळ
रस्ता ओलांडून येथील तसेच परिसरातील ग्रामस्थांना वीज मंडळ, दूरध्वनी व गॅस सिलिंडरसाठी तेथील एजन्सीकडे व त्या भागातील वसाहतीकडे नेहमीच ये-जा करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात घडतात. डांबर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याच्या घटनेला अडीच महिने होऊनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. संबंधित शासकीय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थांसह प्रवाशांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होते.
दुुरुस्तीसाठी आठ दिवसांची मुदत
रस्त्याच्या या स्थितीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या आठ दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. दुरुस्ती न झाल्यास पोलीस प्रशासन संबंधित टोलचे अधिकारी व संबंधित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांना कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा महेंद्र सिसोदे, अशोक पाटील, विजय सिसोदे, लीलाधर सोनार, सनी सिसोदे, राजेंद्र पवार, नितीन जैन, सुभाष संकलेचा, एम.आर. जाधव, सुरेश पाटील, दिनेश सिसोदे आदींनी दिला आहे.