धुळ्यातील कारागृहात दरोड्याच्या शिक्षाबंदीवानाकडून पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 21:07 IST2020-11-14T21:07:35+5:302020-11-14T21:07:59+5:30
साप्ताहीक तट संचार फेरी करत असताना घडला प्रकार

धुळ्यातील कारागृहात दरोड्याच्या शिक्षाबंदीवानाकडून पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ
धुळे : जिल्हा कारागृहात साप्ताहीक तट संचार फेरी करत असताना दरोडा प्रकरणातील शिक्षाबंदी असलेल्या बंदिवानाने पोलीस अधिकाऱ्यांना मोठमोठ्या ओरडून शिवीगाळ करीत गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणल्याने त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार १३ नोव्हेंबर रोेजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडला. दुपारी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दरोडा प्रकरणातील शिक्षाबंदी असलेला महेश प्रकाश पवार हा नाशिक कारागृहातून धुळ्यात एका दुसऱ्या प्रकरणासंदर्भात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने येणारे कोणतेही बंदिवान यांना स्वतंत्र्य ठेवण्यात येते. त्यानुसार महेश पवार याला धुळे जिल्हा कारागृहातील स्वतंत्र्य कोठडीत ठेवण्यात आले होते. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास धुळे जिल्हा कारागृहात पोलीस अधिकारी हे साप्ताहीक तट संचार फेरी करीत होते. त्यावेळेस शिक्षाबंदी असलेला महेश पवार याने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. मला स्वतंत्र्य कोठडीत का ठेवण्यात आले. अन्य बंदिवानाप्रमाणे मला एकत्र का ठेवण्यात आलेले नाही अशी विचारणा त्याने पोलीस अधिकाऱ्यांना केली. कोरोनाच्या अनुषंगाने असे केल्याचे व तात्पुरता असल्याचे त्याला सांगूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने शिवराळ भाषा वापरत गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अंगावर देखील त्याने धावून येण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी तुरुंग अधिकारी दिपा वैभव आगे यांनी शहर पोलीस ठाणे गाठत १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिक्षाबंदी असलेला महेश प्रकाश पवार याच्या विरोधात भादंवि कलम ३५३, १८८, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक एन. एस. आखाडे घटनेचा तपास करीत आहेत.