पोलिसांनी पाठलाग करून खुनातील आरोपीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 21:14 IST2019-11-09T21:14:05+5:302019-11-09T21:14:23+5:30
एलसीबी पथकाची कारवाई, संशयित कन्नड पोलिसांच्या स्वाधीन

पोलिसांनी पाठलाग करून खुनातील आरोपीला पकडले
आॅनलाइन लोकमत
धुळे :कन्नड येथे लुडो खेळाच्या वादातून खून करून शिरपूरमार्गे मध्यप्रदेशात पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला धुळे एलसीबीच्या पोलिसांनी अटक करून त्याला कन्नड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
कन्नड तालुक्यातील चिंचखेडा येथील कौतिक नारायण राठोड याचा राहूल सुबाराव जाधव याने खून केल्याची घटना गुरूवारी घडली होती. घटनेनंतर राहूलने दुचाकीवरून पळ काढला होता. तो धुळे, शिरपूर मार्गे मध्यप्रदेशात पळून जात होता. याबाबतची माहिती एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील यांना गुरूवारी रात्री मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने साध्या वेषात सोनगीर गावाजवळ सापळा रचला. वर्णनात नमूद केलेल्या प्रमाणे एक तरूण दुचाकीवरून जात होता. साध्या वेषातील पोलीस आल्याचे लक्षात येताच संशयित आरोपीने दुचाकी सोडून पळ काढला. तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होत. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला दराणे गावाच्या फाट्याजवळ पकडले.
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक हनुमान उगले, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, अशोक पाटील, विशाल पाटील, गुलाब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान संशयित आरोपीला कन्नड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.