डीजे वाजविल्यास कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:05 IST2020-02-12T23:04:53+5:302020-02-12T23:05:20+5:30
शिवजयंती : शहर पोलिस ठाण्यात बैठक, जयंती पारंपारिक वाद्याने उत्साहात साजरी करण्याचे आवाहन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिवजयंती साजरी करताना डीजे वाजविण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने जयंती उत्सव मंडळातील तरुणांचा हिरमोड झाला आहे़ छ़ शिवाजी महाराज यांची जयंती पारंपारिक वाद्याने उत्साहात आणि शांततेत साजरी करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़
शिवजयंती जसजशी जवळ येत आहे तसतसा तरुणांचा उत्साह वाढतो आहे़ शहरात चौकाचौकामध्ये शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर लागले आहेत़ बाजारात भगवे झेंडे दाखल झाले असून काही तरुणांनी आतापासुनच आपल्या मोटारसयकलींना झेंडे लावले आहेत़ त्यामुळे शिवजयंतीचा उत्साह आजाच दिसू लागला आहे़
येतय १९ फेब्रुवारीला होणारी छ़ शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि शांततेत पार पडावी, जयंती उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे़ यात धुळे शहर पोलिस ठाण्याने आघाडी घेतली असून पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी बुधवारी सकाळी शहरातील जयंती उत्सव मंडळांच्या अध्यक्षांची आणि कार्यकर्त्यांची औपचारिक बैठक बोलावली होती़
बैठकीला उपस्थित असलेल्या जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेला परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी केली़ परंतु डीजे वाजविण्यास बंदी असल्याने परवानगी देवू शकत नाही अशा शब्दात नकार देत पारंपारिक वाद्याच्या सहाय्याने जयंती साजरी करावी, प्रत्येक जयंती उत्सव समितीने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करावी, मद्यपिंवर जातीने लक्ष ठेवावे अशा सूचना केल्या़ जयंती साजरी करणाºया मंडळांनी त्या त्या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीला पोलिस प्रशासन मार्गदर्शन करण्यासाठी आणि तरुणांची समजुत काढण्यासाठी येण्यास तयार असल्याचे पोलिस निरीक्षक पाटील म्हणाले़
दरम्यान, पारंपारिक वाद्य अतीशय महागडे आहेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत या प्रमुख अडचणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या़ परंतु यावर त्यांनीच मार्ग काढावा, स्वत:चे पथक तयार करुन सराव करावा, असे मार्गदर्शन पाटील यांनी केले़
शिवजयंती मिरणुकीची कुणालाही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी़ रुग्णवाहिकांना मार्ग द्यावा़ मिरवणुकीतील प्रात्यक्षिकामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या़
शिवजयंती साजरी करताना सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम देखील राबविणे आवश्यक असल्याचे मत पोलिस निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केले़ दोंडाईचा येथे तरुणांनी शिवजयंतीसाठी जमा केलेल्या निधीतून रुग्णवाहिका सेवा सुरू करुन चांगला आदर्श निर्माण केल्याची आठवण त्यांनी करुन दिली़
शिवजयंती मिरवणुकीत डीजे वाजविल्यास मिरवणुकीनंतर संबंधितांवर कायदेशिर कारवाई करुन गुन्हे दाखल केले जातील, असा ईशारा पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिला़
दरम्यान, शिवजयंती उत्सवासाठी विविध मंडळांची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे़ पोलिसांकडे तशी नोंदणी केली जात आहे़